२० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; तुकाराम मुंडेंकडे मराठी भाषा, लोकेश चंद्रांकडे महावितरण

राज्य सरकारने शुक्रवारी २० आयएएस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या केल्या
२० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; तुकाराम मुंडेंकडे मराठी भाषा, लोकेश चंद्रांकडे महावितरण

राज्य सरकारने शुक्रवारी २० आयएएस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या केल्या. एमएमआरडीचे एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्यावर आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदावर श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सुजाता सौनिक यांची आता सामान्य प्रशासन विभागातून गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

बेस्टचे महासंचालक लोकेश चंद्रा यांची महावितरण विभागात मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पदी बदली करण्यात आली आहे. विजय सिंघल यांची महावितरणमधून मुंबई बेस्टच्या महाव्यवस्थापक म्हणून बदली झाली आहे. बदल्यांनी कायम चर्चेत असलेल्या तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मुंडे यांच्यावर आता मराठी भाषा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अधिकारी अशी ओळख असलेल्या संजीव जयस्वाल यांची गृहनिर्माण विभागातील ‘म्हाडा’च्या उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सुजाता सौनिक या मुख्य सचिवपदाच्या स्पर्धेत होत्या. त्यांची आता सामान्य प्रशासन विभागातून गृह विभागात अपर मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. राधिका रस्तोगी यांची नियोजन विभागात प्रधान सचिवपदी, तर महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांच्याकडे आता अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांची नगरविकास विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. शर्मा यांच्या जागी डॉ. सुधाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंशू सिन्हा यांची खादी ग्रामोद्योगमधून ओबीसी मंत्रालयात सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनुपकुमार यादव यांच्याकडे महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून जबाबदारी सोपविली गेली आहे.

डॉ. अमित सैनी यांची जलजीवन मिशनच्या संचालकपदी, डॉ. माणिक गुरसाल यांची मेरीटाइम बोर्डात मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वर्णी लागली आहे. कादंबरी बलकवडे यांची मेडा (ऊर्जा) च्या महाव्यवस्थाकपदी बदली करण्यात आली आहे. प्रदीपकुमार डांगे यांची रेशीम संचालनालय, नागपूर येथे संचालक म्हणून बदली झाली आहे. शंतनू गोयल यांची सिडको, नवी मुंबईच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान संचालकपदी, तर डॉ. हेमंत वसेकर यांची पुण्यात पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नवे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे ३१ मे रोजी निवृत्त झाले असून, त्यांच्या जागी नाशिक महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in