जिजाऊंचा पुतळा अजूनही सापडेना! पाचाडमधील चोरीच्या घटनेला दहा वर्षे लोटली, शिवप्रेमींमध्ये नाराजीचा सूर

राज्यातील महायुती सरकारने शिवप्रेमींच्या अस्मितेचा विषय म्हणून रायगड विकास प्राधिकरणाद्वारे ६०० कोटींचा प्रकल्प हाती घेतला
जिजाऊंचा पुतळा अजूनही सापडेना! पाचाडमधील चोरीच्या घटनेला दहा वर्षे लोटली, शिवप्रेमींमध्ये नाराजीचा सूर
Published on

शैलेश पालकर/पोलादपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ९ ऑगस्ट २०१३ रोजी पाचाडमधून चोरीला गेलेला पुतळा अजून सापडलेला नसल्याची खंत शिवप्रेमी व्यक्त करीत आहेत. शिवरायांचे नाव घेणारे सरकार राज्यात व केंद्रात सत्तेत असूनही हा पुतळा अद्याप का सापडत नाही, असा सवालही विचारला जात आहे.

राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे ज्येष्ठ वद्य नवमीला बुधवारी तिसऱ्या प्रहरी म्हणजेच ७ जून १६७४ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर माँसाहेबांच्या पाचाड येथील वाड्याजवळच छ. शिवाजी महाराज यांनी त्यांची समाधी बांधली. नंतरच्या काळामध्ये समाधी स्थळाकडे दुर्लक्ष झाले. समाधी सभोवताली असलेल्या संरक्षक भिंतीच्या दगडी चिरा कोसळल्या. समाधीची पडझडसुद्धा झाली. फलटणचे राजे श्रीमंत मालोजीराजे उर्फ नानासाहेब निंबाळकर व लक्ष्मीदेवी राणीसाहेब यांनी समाधीस्थळाचे जिर्णोद्धार बांधकाम सन १९४४ मध्ये पूर्ण करुन घेतले. काम पूर्ण झाल्यानंतर सभोवताली आवार भिंत उभारण्यात आली. यानंतर वन विभागामार्फत सभोवताली झाडे लावण्यात आली. एक सुंदर बगीचा तयार करण्यात आला. केंद्र सरकारच्या पुरातन वास्तू संशोधन विभागाच्या ताब्यात हे समाधीस्थळ असून राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

समाधी सभोवतालची जमीन वनविभागाच्या ताब्यात असल्याने सर्व परिसर संरक्षित करण्यात आला आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीस्थळावर पंचधातू पुतळ्याची स्थापना दहा वर्षांपूर्वी मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी केली असून सुरुवातीच्या काळात पुतळा एका लाकडी बैठकीवर बसविण्यात आला होता. ऊन-पावसामुळे बैठक कमकुवत झाल्याने महाडमधील शिवप्रेमी सुरेश पवार व कार्यकर्त्यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्यासाठी संगमरवरी बैठक तयार करून त्यावर २००२-०३मध्ये पंचधातूच्या साधारणत: एक फूट उंचीच्या पुतळ्याची स्थापना केली. तेव्हापासून २०१३ वर्षापर्यंत मूळ पुतळा त्याच ठिकाणी होता.

९ ऑगस्ट २०१३ रोजी पाचाडमध्ये धो-धो पाऊस कोसळत होता. तेव्हा तेथील परिसर निर्मनुष्य होता. याच वातावरणाचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने पुतळ्याची चोरी केली. या प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू झाली. यासंदर्भात महाड तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भा.दं.वि. ३८९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर पाचाडचे तत्कालीन सरपंच राजेंद्र खातू, तंटामुक्त समितीचे तत्कालीन अध्यक्ष किरण पवार, तत्कालीन उपसरपंच सय्यद युनूस, पाचाडचे माजी सरपंच व समाजसेवक रघुवीर देशमुख, दलितमित्र मधुकर गायकवाड व पाचाड पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांची एक समिती स्थापन होऊन नवीन पुतळा घडविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे तसेच इतिहासतज्ज्ञांच्या सल्ल्याने राजवस्त्रे कशी असावीत, नाक कसे असावे, शस्त्र कसे असावे, पदर कसा असावा यावर विचार करून चंद्रजित यादव या प्रसिद्ध शिल्पकारांनी नवीन पंचधातूचा सध्या असलेला पुतळा घडविला. पाचाडचे माजी सरपंच व समाजसेवक रघुवीर देशमुख यांनी यावेळी राजमाता समाधी स्थळी 'छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची समाधी (पाचाड)' असा उल्लेख केलेला चौथरा बसविला आणि त्यावर नवीन पुतळा बसविण्याचा निर्णय झाला. रातोरात गनिमी काव्याने पुतळा बसविण्याकामी या समितीने यशस्वी प्रयत्न केले. तथापि, चोरीस गेलेल्या पंचधातूच्या मूळ पुतळ्याचा शोध लावण्याकामी अद्याप यश आलेले नाही.

रायगडच्या जिर्णोद्धाराला प्रारंभ

राज्यातील महायुती सरकारने शिवप्रेमींच्या अस्मितेचा विषय म्हणून रायगड विकास प्राधिकरणाद्वारे ६०० कोटींचा प्रकल्प हाती घेतला असून कोकणातला हा एकमेव प्रकल्प असा आहे. त्याद्वारे किल्ले रायगडाचे जिर्णोद्धारपर्व सुरू झाले आहे. राजमाता जिजाऊंचा भग्नावस्थेतील राजवाडा, समाधीस्थळ आणि बगिचा याची सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्यापर्यंत दगडी पायवाट तयार केली असून याआधी पुरातत्त्व विभागाने समाधीस्थळाच्या सभोवतीचे दगडी बांधकाम केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in