काँग्रेस, ठाकरे गटात रस्सीखेच! तिढा सुटणार का? शरद पवार यांच्याशी काँग्रेस नेत्यांची चर्चा

महाविकास आघाडीतील काही जागांवरून काँग्रेस आणि शिवसेनेचा तिढा कायम आहे. जागावाटपावरून शुक्रवारी तब्बल दोन तासांपेक्षा जास्तवेळ चर्चा झाली.
काँग्रेस, ठाकरे गटात रस्सीखेच! तिढा सुटणार का? शरद पवार यांच्याशी काँग्रेस नेत्यांची चर्चा

मुंबई : महाविकास आघाडीची शुक्रवारी मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत. रविवार, १७ तारखेला राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप झाल्यानंतर जागावाटप जाहीर केले जाईल, असे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

दरम्यान, सांगली, रामटेक, पुणे, चंद्रपूर यासह आणखी काही जागांवरून काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्ष या जागा सोडायला तयार नाहीत. दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत काही जागांवरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी शनिवारी शरद पवार यांची भेट घेतली. यावर काय तोडगा निघतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

महाविकास आघाडीतील काही जागांवरून काँग्रेस आणि शिवसेनेचा तिढा कायम आहे. जागावाटपावरून शुक्रवारी तब्बल दोन तासांपेक्षा जास्तवेळ चर्चा झाली. यात अधिकाधिक वेळ शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील काही जागांच्या वाटपाच्या चर्चेतच गेला. यासोबतच वंचित बहुजन आघाडीला चार जागा देण्याचे ठरले. एवढेच नव्हे, तर वंचित आघाडी सोबत आली, तर चार जागा द्यायच्या आणि नाही आली तर त्या चार जागांचे काय करायचे, यावरही चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे वंचित सोबत येणार का, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच काही जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे राज्यातील नेते बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावर आता काय तोडगा निघतो, ते पाहणे आवश्यक आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरची जागा मूळ शिवसेनेची आहे; मात्र, तिथे शाहू महाराज महाविकास आघाडीतून लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेने काँग्रेसला सोडली. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेसकडे असलेल्या सांगलीची जागा मागितली. कोल्हापूर सोडल्याने पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाला जागाच शिल्लक नसल्याने ते सांगलीच्या जागेवर ठाम आहेत; मात्र, येथे काँग्रेसची ताकद मोठी आहे आणि विशाल पाटील यांनी तिथे जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे काँग्रेस ही जागा सोडायला तयार नाही. या बदल्यात शिवसेनेने पुण्याची जागा मागितली आहे. परंतु काँग्रेस पुण्याची जागाही सोडायला तयार नाही. त्यामुळे शिवसेनेची नाराजी आहे. यासोबतच रामटेकच्या जागेवरूनही काँग्रेस आणि शिवसेनेत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. यावर तोडगा म्हणून शिवसेना ठाकरे गटाने सांगलीऐवजी पुणे आणि चंद्रपूरची जागा मागितली आहे. मात्र, यातून अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही. यावर शरद पवार काय सल्ला देतात आणि कसा तोडगा काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in