कोकण संस्कृतीचे सातासमुद्रापार दर्शन घडवण्यासाठी २५ वर्षीय तरुणाची धडपड

कमी वयात २०० हून अधिक पोट्रेट पेंटिंग्स; मुंबई आर्ट फेस्टीव्हलमध्ये विशेष पारितोषिकाची कमाई
कोकण संस्कृतीचे सातासमुद्रापार दर्शन घडवण्यासाठी २५ वर्षीय तरुणाची धडपड

संस्कृती जपली पाहिजे, संस्कृती पटवून दिली पाहिजे हे प्रत्येकाला वाटते. मात्र बोटावर मोजण्याइतकेच लोक त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्याच्या लोरे नं.१ या खेडेगावात जन्मलेला शैलेश गुरव हा होतकरू तरुण चित्रकार त्यापैकीच एक. आपली कोकणची माती, आपले गाव, आपली संस्कृती, आपला निसर्ग याची ओळख सातासमुद्रापार पटवून देण्यासाठी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी शैलेश चित्र प्रदर्शनांमार्फत प्रयत्न करत आहे. पोट्रेट, अँक्रिलिक चित्र आणि रंगसंगतीतून शैलेश गेली ७ वर्षे मुंबईसारख्या शहरातून आपल्या मातीची, संस्कृतीची जाण ठेवत एक ना एक दिवस परदेशातही कोकणच्या संस्कृतीचा, तेथील निसर्गाचा डंका पेटून उठेल असा विश्वास आपल्या चित्रांद्वारे व्यक्त करत आहे.

कणकवली सारख्या निसर्गसंपन्न तालुक्यात चित्रकार शैलेश गुरव याचे बालपण गेले. पुढे शालेय जीवनात मुंबईसारख्या भव्य शहरात आल्यावर कलेविषयी अधिक उत्साह त्याच्यामध्ये आला. पुढे शालेय जवान संपल्यावर २ वर्षांचा अँनिमेशन कोर्स करत त्याद्वारेच अंधेरी येथे २ वर्षे एका चांगल्या कंपनीत शैलेशने नोकरी केली. पण नोकरी, प्रवास आणि पेंटिंग याची योग्य सांगड घालणे अशक्य होत असल्याने चांगल्या पगाराची नोकरी सोडत पूर्णवेळ पेंटिंग करण्याला शैलेशने प्राधान्य दिले. यासाठी चित्रकार निलेश निकम यांच्याकडून त्यांनी पेंटिंग्सच्या विविध प्रकारांचे धडे घेतले. आर्थिक, मानसिक अडचणींवर मात करत पूर्णवेळ सराव करत पोट्रेट चित्रे आपण खात्रीशीर रेखाटू शकतो. त्यातील बारकावे देखील सहज रेखाटू शकतो हा आत्मविश्वास शैलेशला आला. लहानपणापासूनच समुद्र, कोकणचा पेहराव, खाद्यसंस्कृती, सण -उत्सव, निसर्ग याविषयी अभिमान आणि आपुलकी असल्याने शैलेशने विषयानुरूप चित्रनिर्मिती केली. त्याने चित्रांत नंदीबैल, शेतकऱ्याची त्याच्या नंदीबैलावर असलेली माया, गायी व वासराचे निरागस प्रेम, शेतकऱ्याकडील नष्ट होत असलेल्या दुर्मीळ वस्तू, लामणदिवा, तसेच तेहत्तीस कोटी देव असणाऱ्या गायीला शेतकरी देवता मानून तिची पूजा करतो यासारख्या अनेक विषयांतर्गत पेंटिंग्सद्वारे संस्कृती दर्शविण्याचा प्रयत्न केला. तर कधी नागरी व ग्रामीण दैनंदिन जीवनाचे प्रतिबिंब दिसेल अशी पेंटिंग्स साकारली. पुढे त्याचे पहिले चित्रप्रदर्शन वरळीतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे २०१९ मध्ये भरले. त्यानंतर शैलेशने मागे वळून पाहिले नाही. २ वर्षात ८ ते १० प्रदर्शनात त्याची चित्रे प्रदर्शित करण्यात आली तर काही पेंटिंग्सना रसिकांची कौतुकाची थाप देखील मिळाली. याची आणखी एक पोचपावती म्हणजे त्याच्या काही पेंटिंग्सना चक्क लंडनमध्ये प्रदर्शनात सहभाग घेण्याची संधी मिळाली. आतापर्यंत शैलेशने २०० हून अधिक पोट्रेट साकारली असून २०१८ मध्ये मुंबई आर्ट फेस्टीव्हलच्या विशेष पारितोषिकाचा तो मानकरी ठरला आहे. तर आपली संस्कृती जपण्यासाठी जिद्दीने प्रवास करणाऱ्या शैलेशने अलीकडेच विरार येथे ''अंतरंग'' नावाचा स्वतःचा स्टुडिओ सुरु केला आहे. याठिकाणी तो स्वतः सराव करत विद्यार्थ्यांचे पेंटिंग्सचे क्लासेसही घेत आहे.

चित्रकार म्हंटलं की किती कमावत असणार? नोकरी- व्यवसाय करायला हवा अशा प्रतिक्रिया येतात. पण माझं म्हणणं आहे की आपल्या कौशल्यावर सर्वकाही अवलंबून आहे. आपण जेवढा सराव करू तेवढे आपले पेंटिंग्स लोकांपर्यंत पोहचतील. नाहीशी, दुर्लक्षित होत चालली कोकणातील संस्कृती जपणे आणि त्या संस्कृतीचे दर्शन सर्वांना चित्रातून घडवणे यासाठीच माझी धडपड आहे.

- शैलेश गुरव, चित्रकार

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in