पुणे : राजाविरुद्ध कोणीही कितीही प्रखर विचार मांडले तरी त्याने ते सहन करून आत्मचिंतन केले पाहिजे आणि हीच खरी लोकशाहीची कसोटी असल्याचे परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. गडकरी यांच्या विधानाचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून राज्यकर्ता कोण आणि प्रखर मत मांडणारे कोण, याबद्दलही तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.
संत साहित्याचे अभ्यासक आणि माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांच्या अमृतमहोत्सवी गौरव ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यमान राजकीय स्थिती पाहता या विधानाचे वेगळे अर्थ लावले जात आहेत. सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता असा घेतला जातो. मात्र त्या शब्दाचा अर्थ हा सर्वधर्मसमभाव आहे, लेखक आणि विचारवंतांनी निर्भयपणे व्यक्त झाले पाहिजे, असेही केंद्रीय मंत्री म्हणाले.
आपली भारतीय संस्कृती आणि इतिहास ही आपल्याला मिळालेली देणगी आहे. सहिष्णुता हे आपले वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वरांनी पसायदानात सांगितले आहे की, विश्वाचे कल्याण झाले पाहिजे. दुसऱ्याच्या भविष्याबद्दल भावना व्यक्त करणे ही आपल्या संस्कृतीची विशेषता आहे. कोणत्याही धर्माची मूलभूत तत्त्वे ही सारखीच आहेत, असेही ते म्हणाले.
आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही आहोत, लोकशाही चार स्तंभांवर उभी आहे. या चारही स्तंभांचे अधिकार संविधानात आहेत. जे समाजाच्या हितासाठी आहे, देशहितासाठी आहे. त्याप्रमाणे ते मांडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिले आहे. गडकरी हे प्रसंगी स्वपक्षावर, पक्षनेतृत्वावर आणि राजकीय स्थितीवर मनमोकळे भाष्य करण्याविषयी ओळखले जातात.
विचारशून्यता ही समस्या
कोणतीही व्यक्ती धर्म, भाषा, प्रांत यामुळे मोठी होत नाही तर त्याच्या कर्तृत्वाने मोठी होते. डॉ. पठाण यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असेल, कारण त्यांनी परखडपणे विचार मांडले आहेत. स्वधर्म आणि अन्य धर्मातील टीका त्यांनी सहन केली असेल. पण त्याची चिंता न करता त्या विषयाबद्दल कटिबद्धता ठेवून त्यांनी सातत्याने विचार कायम ठेवला. आपल्या देशात विचारभिन्नता ही समस्या नाही विचारशून्यता ही समस्या आहे, असेही गडकरी म्हणाले.