वैशाली दरेकर यांना कल्याणमध्ये संधी; ठाकरे गटाचे आणखी चार उमेदवार जाहीर

शिवसेनेने आतापर्यंत एकूण २१ उमेदवार घोषित केले आहेत. उत्तर-मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई वगळता मुंबईतील इतर चार मतदारसंघात ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे. तर उत्तर मुंबई मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू आहे.
वैशाली दरेकर यांना कल्याणमध्ये संधी; ठाकरे गटाचे आणखी चार उमेदवार जाहीर

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाने बुधवारी आणखी चार उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे हे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या कल्याण लोकसभा मतदासंघातून ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर जळगावमधून पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना संधी देण्यात आली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शिवसेना शिंदे गटाकडून कल्याण लोकसभा मतदासंघात डॉ. श्रीकांत शिंदे यांनाच उमेदवारी मिळणार हे स्पष्ट असले तरी अद्याप त्यांच्या उमेदवारीची घोषणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने येथील उमेदवार जाहीर करून त्यांच्यावर कुरघोडी केली आहे. भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणारे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना ठाकरे गटाने जळगावमधून उमेदवारी दिली आहे. पवार यांचा सामना आता भाजपच्या स्मिता वाघ यांच्याशी होणार आहे. उन्मेष पाटील यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे जळगावमधून त्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी करण पवार यांच्यावर विश्वास व्यक्त केला. दरम्यान, ठाकरे यांनी पालघरमधून भारती कामडी तर हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी यांना पाठिंबा न देता माजी आमदार सत्यजित पाटील यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे.

भारती कामडी या पालघर जिल्हा परिषदेवर दोन वेळा निवडून आल्या असून त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. कामडी यांच्याकडे ठाकरे गटाचे महिला लोकसभा संघटकपद असून त्यांचा लोकसंपर्क दांडगाआहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. कामडी यांना त्यांच्या निष्ठेचे फळ आता मिळाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे पाठिंबा मागितला होता. त्यासाठी शेट्टी यांनी दोनवेळा मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. मात्र, पाठिंबा मागण्याऐवजी 'मशाल' चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव त्यांना ठाकरेंकडून देण्यात आला होता. मात्र, शेट्टी यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिल्याने शिवसेनेने हातकणंगलेत स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे आतापर्यंत २१ उमेदवार घोषित

शिवसेनेने आतापर्यंत एकूण २१ उमेदवार घोषित केले आहेत. उत्तर-मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई वगळता मुंबईतील इतर चार मतदारसंघात ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे. तर उत्तर मुंबई मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू आहे. याविषयी उद्धव ठाकरे यांना विचारले असता, यासंदर्भात मित्र पक्षांशी चर्चा सुरू असून ते ती जागा लढवणार असतील तर ठीक आहे, नाहीतर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीत ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघावरून तिढा कायम आहे. भाजपने या दोनपैकी एका जागेवर दावा सांगितल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. शिंदे गट आणि भाजपमधील जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर कल्याणमधून डॉ. श्रीकांत शिंदे यांनाच उमेदवारी मिळणार हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने कल्याणमध्ये महिला उमेदवार दिला आहे.

दरेकर मनसेतून शिवसेनेत दाखल

वैशाली दरेकर यांनी २००९ ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चिन्हावर लढवली होती. त्यावेळी त्यांनी एक लाखांहून अधिक मते घेतली होती. परंतु, मनसेत कोंडी होऊ लागल्याने त्या पक्षातून बाहेर पडून शिवसेनेत दाखल झाल्या. शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले, त्यानंतरही त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबरच राहणे पसंत केले.

सिंधुदुर्ग-रत्नागिरीवरून भाजप-शिंदे गटात जुंपली

त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. खरे तर यावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मंगळवारी रात्री चर्चा झाल्यानंतर शिवसेनेचे उदय सामंत यांनी या जागेवरचा दावा सोडला होता. विशेष म्हणजे त्यासंबंधी सोशल मीडियावर पोस्टही टाकण्यात आली होती. त्यामुळे ही जागा जवळपास भाजपला सुटली असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आज सकाळी किरण सामंत यांनी पुन्हा आपली भूमिका बदलली. त्यांनी रात्री टाकलेली पोस्ट आज डिलीट केली आणि आपण रत्नागिरी-सिंधुदुर्गचा दावा सोडलेला नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे पुन्हा या जागेवरून वाद सुरू झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, मंत्री उदय सामंत आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यात रात्री उशिरा चर्चा झाली. रात्री दीड ते दोनच्या सुमारास त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर उदय सामंत मुंबईला निघून गेले होते. उदय सामंत यांनी सिंधुदुर्गात झालेल्या महायुतीच्या बैठकीतही हजेरी लावली नाही. दरम्यान, नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, काय घडले, ते समजू शकले नाही. परंतु, उदय सामंत यांनी किरण सामंत यांनी जे रात्री ट्विट केले, ते भावनेच्या भरात केले होते. आम्ही अजूनही रत्नागिरी-सिंधुदुर्गचा दावा सोडलेला नाही, असे स्पष्ट केले.

सामंत बंधूंचे घूमजाव

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजपचे नारायण राणे आणि शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर खुद्द किरण सामंत यांनी मंगळवारी रात्री आम्ही या जागेचा दावा सोडलेला आहे, असे ट्विट करून जाहीर केले. परंतु, आज सकाळी पुन्हा हे ट्विट डिलिट करून आम्ही जागेवरचा दावा सोडलेला नाही, असे जाहीर केले. त्यामुळे सामंत बंधूंच्या मनात नेमके काय चालले आहे, अशी चर्चा आहे. दुसरीकडे नारायण राणे ही जागा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात हा वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे.

उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश

जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपला रामराम करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बुधवारी प्रवेश केला. मला उमेदवारी नाकारली म्हणून ही भूमिका घेतलेली नाही, तर पक्षात आपली अवहेलना होत असल्याने स्वाभिमान जपण्यासाठी आपण स्वाभिमानाने लढणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा अनुयायी झाल्याचे उन्मेष पाटील यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन

आमच्या दोघांच्याही आजोबांचे ऋणानुबंध होते. आम्ही हुकूमशाहीविरोधात एकत्र आलो होतो. आज आपले जमले नसेल, पण भविष्यात जमणारच नाही, अशी भूमिका घेऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना केले. प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने मविआशी फारकत घेऊन वेगळी चूल मांडल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. भविष्यात शिंदेंच्या शिवसेनेतील कोणालाही आपल्या पक्षात घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (सविस्तर मुंबई पानावर)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in