चोरट्यांना ‘ग्रामस्थांनी’ पकडले अन् ‘पोलिसांनी’ सोडले; खटाव तालुक्यातील घटना

येथून जवळच असलेल्या धोंडेवाडी (ता.खटाव) येथे रात्रीच्या वेळी शस्त्रासह वावर असणाऱ्या काही चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडले व त्यांना वडूज पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र पोलिसांनी त्यांना दुसऱ्याच दिवशी 'सोडून' दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चोरट्यांना ‘ग्रामस्थांनी’ पकडले अन् ‘पोलिसांनी’ सोडले; खटाव तालुक्यातील घटना
प्रातिनिधिक फोटो
Published on

कराड : येथून जवळच असलेल्या धोंडेवाडी (ता.खटाव) येथे रात्रीच्या वेळी शस्त्रासह वावर असणाऱ्या काही चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडले व त्यांना वडूज पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र पोलिसांनी त्यांना दुसऱ्याच दिवशी 'सोडून' दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास धोंडेवाडी गावच्या हद्दीतील मायणी-दहिवडी रस्त्यावरील गारवा ढाब्याजवळ काही चोरटे शस्त्रासह वावरत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यानुसार ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी जात काही चोरट्यांना पकडले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून संशयास्पद माहिती सांगितली जात होती. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वडूज पोलीसांना दिली असता ड्युटीवरील पोलीसांनी ही माहिती रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम व पोलीस नाईक प्रवीण सानप यांना दिली. त्यानुसार रात्रगस्तीवर असणारे पोलीस पथक घटनास्थळी गेले असता धोंडेवाडीचे ग्रामस्थ नागेश घाडगे, संजय मासाळ, महादेव बागडे, विठ्ठल मासाळ व इतर २० ते २५ लोकांनी दोन युवकांना ताब्यात घेतले होते. पोलीसांनी चौकशी केली असता त्यांनी आपली नावे रोहित रजपूत व विकास कोळी अशी असल्याचे पोलिसांना सांगितले. दोघांनीही तोंडाला रुमाल बांधत ते रात्रीच्या वेळी शस्त्रासह फिरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची वडूजच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ प्रमाणे त्यांच्याविरोधात पोलीस नाईक प्रवीण सानप यांनी गुन्हा दाखल केला आहे.

...म्हणून सोडून दिले!

याबाबत वडूज पोलिसांकडे संपर्क साधला असता त्यांनी नवीन कायद्यानुसार मोठ्या शिक्षेस पात्र नसणाऱ्या गुन्ह्यात चोरट्यांना अधिक काळ अटक करता येत नसल्याने सोडून देण्यात आले असल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in