विशेष प्रतिनिधी/मुंबई
शिवसेना शिंदे गटाने हिंगोली लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली होती आणि ते तयारीलाही लागले होते. मात्र, त्यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवली. आता हेमंत पाटील यांच्याऐवजी तेथे बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर यवतमाळ-वाशिममध्ये पाचवेळा खासदार असलेल्या भावना गवळी यांचा पत्ता कट करून तेथे हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या दबावाखाली शिंदे यांच्या शिवसेनेला हिंगोलीत उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवली आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात हेमंत पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली होती. मात्र, त्यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध केला. या मतदारसंघात भाजपचे ३ आमदार आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला सोडावी, अशी भूमिका भाजपने घेतली होती. त्यामुळे भाजपने हिंगोलीची उमेदवारी बदलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढवला. परंतु हेमंत पाटील उमेदवारीसाठी आग्रही होते. अखेर महायुतीतील संघर्ष टाळण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी मागे घ्यावी लागली. हा शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, हेमंत पाटील नाराज होऊ नयेत, म्हणून वाशिम-यवतमाळ मतदारसंघात त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजश्री पाटील या यवतमाळ-वाशिम जिल्ह्यातील माहेरवाशीण आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु, हा बदल करीत असताना यवतमाळ-वाशिम मतदारसंघात सलग पाचवेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला. त्या उमेदवारीसाठी आग्रही होत्या. परंतु भाजपच्या दबावामुळे त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे आता त्या काय भूमिका घेतात, यावर या मतदारसंघातील गणित अवलंबून आहे.
भावना गवळी यांना आधीच मिळाले संकेत
भावना गवळी या गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होत्या. सातत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी आग्रही होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढला होता. मात्र, भाजपचा भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही नागपूरला जाऊन भेट घेतली होती. परंतु फडणवीस यांनीही त्यांची निराशा केली. त्यामुळे बुधवारी त्या ‘वर्षा’ बंगल्यावर ठाण मांडून होत्या. परंतु, अखेर त्यांचा पत्ता कट झाला.
अचानक पुढे आली नवी नावे
हिंगोलीसाठी हेमंत पाटील आणि यवतमाळ-वाशिममधून भावना गवळी आग्रही होते. परंतु, भाजपच्या दबावामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी पर्यायी नावावर विचार सुरू केला. आज दिवसभर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना हिंगोलीसाठी बाबूराव कदम कोहळीकर आणि यवतमाळ-वाशिममधून राजश्री पाटील यांची नावे अचानक चर्चेत आली आणि त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आता उद्या अखेरचा दिवस असल्याने दोघेही उद्या थेट निवडणुकीचा एबी फॉर्म भरणार आहेत.