
सुजीत ताजणे / छत्रपती संभाजीनगर
‘मिशन अयोध्या’ चित्रपट ट्रेलर प्रदर्शन गोदाधामचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्याहस्ते झाले. त्यावेळी महाराज म्हणाले की देशाचे आजचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी स्वातंत्र्यापूर्वी १९११ मध्ये कोलकाता या ठिकाणी तत्कालीन ब्रिटिश राजा जॉर्ज पंचम यांच्यासमोर व त्यांच्या समर्थनार्थ गायिले. यामध्ये राष्ट्राचे संबोधन नाही, पंचम याने भारतावर अनेक अन्याय,अत्याचार केले. त्यामुळे देशाचे खरे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ नाही तर ‘वंदे मातरम’ असले पाहिजे, असे विधान गोदाधामचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी केले. मंगळवारी ‘मिशन अयोध्या’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाप्रसंगी गोदाधामचे मठाधिपती रामगिरी महाराज उपस्थित होते. त्यावेळी भविष्यामध्ये यासाठीही संघर्ष करावा लागेल, असेही महाराज म्हणाले.
महंत रामगिरी पुढे म्हणाले, जनगणमन अधिनायक जय हे, भारतभाग्यविधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधी तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे. गाहे तव जयगाथा या शब्दांचा अर्थ असा की, टागोर यांनी तुम्ही भारताचे भाग्यविधाते आहात, अशी पंचम यांची स्तुती केली. तसेच तुमच्या शुभ नामाच्या ठिकाणी जागे आहेत. तुमच्याकरिता आशीर्वाद मागत असून तुमची जय जय गाथा गात आहेत, अशी स्तुती टागोर यांनी पंचम यांची केली. या शब्दांमध्ये राष्ट्राच्या संबोधनाचा एकही शब्द नाही. त्यामुळे राष्ट्रगीत हे ‘वंदे मातरम’ असले पाहिजे, असे महाराज यांनी म्हटले. तसेच माझ्या वक्तव्याचा विरोध होईल, मात्र हे विधान माझे नाही. तुम्ही इतिहास चाळा मग समजेल. सत्य कधी लपत नसते ते समोर येतच असते, असे महाराज म्हणाले. तसेच दुर्दैवाने आपल्या अभ्यासक्रमात शिकवले गेले आहे.
म्हणून टागोरांना नोबेल पुरस्कार मिळाला
रवींद्रनाथ टागोर यांचे तत्कालीन शिक्षण क्षेत्रात खूप मोठे काम आहे. मात्र आजच्या शिक्षण क्षेत्रातील लोकांचा विचार केला तर त्यांना राजकारणी लोकांशी समतोल राखावा लागतो. त्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांना ब्रिटिशांशी समतोल राखावा लागला. म्हणून त्यांनी त्यांची स्तुती केली, या कारणाने त्यांना नोबेल पुरस्कारही मिळाला आहे.
साधू-संतांना चुकीच्या पद्धतीने दाखवले
आतापर्यंत चित्रपटांमध्ये हिंदू धर्मातील साधू-संतांना चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले. त्याच पद्धतीने मुस्लिम धर्मगुरू किंवा ख्रिश्चन धर्मगुरू विरोधात असे दाखवले गेले नाही. मात्र आज हिंदू धर्मातील साधू-संतांबद्दल चांगले दाखविण्यात येत आहे, असे म्हणत मिशन अयोध्या मराठी चित्रपटाला रामगिरी महाराजांनी शुभेच्छा दिल्या.