महायुतीच्या गाडीला भ्रष्टाचाराची चाके; उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल; गडकरींना मविआकडून निवडणूक लढवण्याचे आवाहन!

अमित शहा यांनी छ. संभाजीनगर दौऱ्यावर असताना राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे ‘पंक्चर झालेली रिक्षा’ अशी टीका केली होती, त्याला प्रत्युत्तर देताना...
महायुतीच्या गाडीला भ्रष्टाचाराची चाके; उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल; गडकरींना मविआकडून निवडणूक लढवण्याचे आवाहन!
(संग्रहित छायाचित्र)

विशेष प्रतिनिधी/मुंबई

अमित शहा यांनी छ. संभाजीनगर दौऱ्यावर असताना राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे ‘पंक्चर झालेली रिक्षा’ अशी टीका केली होती, त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना (उबाठा) नेते उद्धव ठाकरे यांनी ‘राज्यातील अनेक भ्रष्ट नेते आपल्याकडे घेऊन भाजपने बेकायदेशीर सरकार स्थापन केले असून, महायुतीच्या गाडीला तर ‘भ्रष्टाचाराची चाके’ आहेत’, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी फसवी असून, या फसव्या सरकारला आता मातीत गाडायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी धाराशिव लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. सकाळी औसा येथे झालेल्या जाहीर सभेत ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

धाराशिव लोकसभेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाचे आहेत. त्यांच्या प्रचारार्थ त्यांनी आज जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारवर सडकून टीका केली. ‘आमदार, खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपली असे नाही. उलट आमची शिवसेना अशा लोकांना मातीत गाडून पुढे जाणारी आहे. याला अशा लाखो शिवसैनिकांचे बळ आहे. तेच आता योग्य वेळेची वाट पाहात आहेत’, असे ठाकरे म्हणाले.

अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडताना ठाकरे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शेपूट घालणारे गृहमंत्री आहेत. त्यांच्यासारखा नागोबा परवा छ. संभाजीनगर येथे आला आणि इथेच फणा काढून उभा राहिला. हे जळत असलेल्या मणिपूरमध्ये जाऊन फणा काढत नाहीत, अरुणाचलमध्ये चीन घुसत आहेत, तिथे हे आवाज करीत नाहीत. मात्र, हे शेपूटघाले येथे येऊन फुत्कार सोडत आहेत. यांना आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे.

एकाधिकारशाहीविरोधात आमचा लढा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यातील घराणेशाहीवर बोलत आहेत. मात्र, यांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकारच नाही. तुम्ही २०४७ ची गॅरंटी देत आहात. तोपर्यंत तुम्ही, आम्ही राहणार का, आज काय देणार आहात, त्याची गॅरंटी आम्हाला द्या, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला आणि आमचा लढा एकाधिकारशाहीविरोधात असल्याचे म्हटले.

गडकरींनी मविआकडून निवडणूक लढवावी!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपने अद्याप तिकीट दिलेले नाही. त्यांनी भाजपचा राजीनामा द्यावा व मविआकडून निवडणूक लढवावी, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी उमरगा येथील सभेत केले.

logo
marathi.freepressjournal.in