रवी राणा यांच्या घरी चोरी; दोन लाखांची कॅश घेऊन नोकर बिहारला पळाला

अपक्ष आमदार रवी राणा यांच्या नोकराने दोन लाखांची कॅश चोरी करुन पलायन केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
रवी राणांच्या घरी चोरी
रवी राणांच्या घरी चोरीप्रातिनिधिक फोटो

विशेष प्रतिनिधी, मुंबई:

अपक्ष आमदार रवी राणा यांच्या नोकराने दोन लाखांची कॅश चोरी करुन पलायन केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. अर्जुन मुखिया असे या नोकराचे नाव असून त्याच्याविरुद्ध खार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरीनंतर अर्जुन हा बिहारच्या गावी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम तिथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मालकीचे खार परिसरात एक फ्लॅट आहेत. या फ्लॅटची सर्व जबाबदारी त्यांचा खाजगी पीए संदीप सुभाष ससे यांच्यावर आहे. याच फ्लॅटमध्ये गेल्या दहा महिन्यांपासून अर्जुन हा घरगडी म्हणून कामाला होता. तो मूळचा बिहारच्या दरभंगाचा रहिवाशी आहे. दिवसभर काम करुन तो तिथे राहत होता. मार्च महिन्यांत तो होळीनिमित्त त्याच्या गावी गेला आणि परत आला नाही. त्यामुळे संदीप ससे यांनी त्याला अनेकदा कॉल केला होता, मात्र त्याने कॉल घेतला नाही. फेब्रुवारी महिन्यांत घरखर्चासाठी रवी राणा यांनी त्यांना दोन लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी त्यांच्या कपाटात ठेवली होती. सोमवारी त्यांनी घरखर्चासाठी काही रक्कम काढण्यासाठी कपाट उघडले होते, यावेळी कपाटात दोन लाख रुपये नव्हते. संपूर्ण कपाटाची पाहणी करुनही त्यांना कुठेच पैसे मिळाले नव्हते.

या फ्लॅटमध्ये त्यांच्यासह अर्जुन वगळता इतर कोणीही येत नव्हते. त्यामुळे अर्जुननेच ही चोरी करुन होळीचा बहाणा करुन गावी पलायन केले असावे असा त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार रवी राणा यांना फोनवरुन सांगितले. त्यानंतर त्यांनी खार पोलीस ठाण्यात अर्जुनविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अर्जुन मुखियाविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

logo
marathi.freepressjournal.in