
मुंबई : राज्यातील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहन खरेदी करताना पार्किंगच्या जागेची माहिती देणे आवश्यक असल्याचे धोरण राबवण्याच्या विचारात सरकार आहे. मात्र असे असले तरी पार्किंगची व्यवस्था नसेल तरी मुंबईकरांना वाहन खरेदी करता येणार आहे. त्यासाठी त्यांना पार्किंगची खरेदी करावी लागणार आहे किंवा मुंबई महापालिकेकडून पार्किंगची जागा भाड्याने घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईत वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर होते. ही वाहतूककोंडी कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकार या उपाययोजनांचा विचार करत आहे. आम्ही मुंबईत अनेक सार्वजनिक पार्किंग जागा तयार केल्या आहेत आणि आता एका अॅपद्वारे त्या उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे जर तुमच्याकडे पार्किंगची जागा नसेल तर तुम्ही पार्किंगची खरेदी करू शकता किंवा मुंबई महापालिकेकडून पार्किंगची जागा भाड्याने घेऊ शकता. पण पार्किंगच्या जागेशिवाय कार खरेदी करणे आणि ती रस्त्यावर पार्क करणे हे शक्य होणार नाही.