...तर पाटणकर काढा घ्यावा लागेल! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना इशारा

जगभरातील लोक दिल्लीत आले. अभिमान वाटावा असा कार्यक्रम झाला
...तर पाटणकर काढा घ्यावा लागेल! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना इशारा
ANI

जळगाव : दिल्लीला जी-२० शिखर बैठकीवेळी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट झाली. ते मला म्हणाले, ‘हाऊ इज यूटी’. मी म्हणालो, ‘व्हाय’. त्यावर ते म्हणाले की, दरवर्षी ते लंडनला येतात, मोठमोठ्या प्रॉपर्टी घेतात, मोकळी हवा खातात, तुम्ही लंडनला या, मी सगळं सांगतो. त्यामुळे त्यांनी आमच्यावर बोलण्याची वेळ येऊ देऊ नये, अन्यथा त्यांना पाटणकर काढा घ्यायची वेळ येईल, असा जोरदार टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

पाचोरा येथे मंगळवारी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, अनिल पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘भारताचा ठसा जगात उमटवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देश महासत्तेकडे जात आहे, पण याची पोटदुखी काहींना का असावी. सरकार गेल्याचे अद्याप त्यांच्या पचनी पडलेले नाही. सत्ता गेली, हे ते मान्य करायला तयार नाहीत, हे दुर्दैव आहे. आता हे सामान्यांचे, गोरगरीबांचे सरकार आहे. कितीही टीका केली तरी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू राहणार आहे,’’ असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सत्ता गेल्याने संतुलन बिघडले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल उद्धव ठाकरेंनी काढलेल्या उद्गारांबाबत बोलताना शिंदे म्हणाले, ‘‘सत्ता गेल्याने या लोकांचे संतुलन गेले आहे. जगभरातील लोक दिल्लीत आले. अभिमान वाटावा असा कार्यक्रम झाला. तो पाहण्याचे भाग्य लाभले. ठरावांना जगाने एकमताने मान्यता दिली, याचे खरे तर त्यांनी स्वागत करायला हवे. पण, सरकार गेल्यावर त्यांचे संतुलन बिघडले आहे. पायाखालची वाळू सरकू लागली आहे आणि काहीही बोलू लागले आहेत. मी ब्रिटनच्या पंतप्रधानांना भेटलो, काय बोललो, असे त्यांनी विचारले. मी बोललो तर त्यांना पाटणकर काढा घ्यायची वेळ येईल, असा सणसणीत इशारा शिंदे यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in