... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी रविवारी सोलापूर येथील अकलूजमध्ये फडणवीस यांची प्रचारसभा पार पडली.
... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

मुंबई : 'माझ्याशी विश्वासघात केला, तर ईश्वर त्यांचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही', असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकलूजच्या प्रचारसभेत केले होते. माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी रविवारी (२८ एप्रिल) सोलापूर येथील अकलूजमध्ये फडणवीस यांची प्रचारसभा पार पडली. यासभेत फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज (२९ एप्रिल) निशाणा साधला.

काय म्हणाले होते फडणवीस?

'मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही, कोणाचं वाईटही चिंतत नाही, कोणाला त्रासही देत नाही. माझ्या पूर्ण आयुष्यात तुम्ही बघा. पण, ईश्वराची देणगीच आहे...माझ्याशी विश्वासघात केला की ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही. माझा इतिहास तपासा, मी काहीच करत नाही. मी राजकारणीच नाही. त्यामुळे मला राजकारणातील छक्के-पंजे, याला खाली पाड, त्याला वर कर, याला गाड, त्याला पाड हे धंदे जीवनात केले नाहीत. पण, कुठे तरी आई तुळजा भवानी आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. आपल्याशी विश्वासघात केला की, सत्यानाश झाला म्हणून समजा', असे फडणवीस अकलूजच्या सभेत म्हणाले होते.

रोहित पवारांनी घेतला समाचार

फडणवीसांच्या या वक्तव्याचा रोहित पवारांनी खरपूस समाचार घेतलाय. 'देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर, त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल', असे पवार म्हणालेत. "देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल! ...आणि आज ज्याला तुम्ही ईश्वराचा आशीर्वाद म्हणताय ना ते आशीर्वाद नाही तर सत्तेचा गैरवापर करत केलेली कपटी कारस्थानं आहेत…तुम्ही कुणाला येडं बनवता? ईश्वराचा आशीर्वाद कुणाला आहे, हे ४ जूनला स्पष्ट होईल," अशी पोस्ट पवारांनी एक्सवर केली, त्यासोबत फडणवीसांच्या भाषणाचा व्हिडिओही जोडला आहे.

पुन्हा निवडून आले तर...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फडणवीस यांनी अकलूजच्या सभेतून टीका केली होती. फडणवीस म्हणाले, शरद पवार यांना जे जमले नाही, ते निंबाळकर यांनी पाच वर्षात करून दाखविले आहे. याचा शरद पवारांना राग आहे. त्यामुळे निंबाळकर पुन्हा निवडून आले तर, त्यांचे दुकान बंद होईल, असे फडणवीस म्हणाले होते.

माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहित पाटील आणि महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये चुरशीची लढत होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in