महायुतीतील पेच अद्याप कायम

भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन प्रतिनिधित्व करत असलेल्या उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवार जाहीर केलेला नाही. उमेदवारीला विलंब होत असल्याने पूनम महाजन यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळेल का यावरील प्रश्नचिन्ह गडद झाले आहे.
महायुतीतील पेच अद्याप कायम
संग्रहित छायाचित्र, पीटीआय
Published on

मुंबई : राज्यात महायुतीतील जागावाटपाचा पेच अद्याप सुटण्याची चिन्हे नाहीत. महायुतीतील भाजपने आतापर्यंत राज्यातील २३ जागांचे उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, भाजपने अद्याप उत्तर-मध्य मुंबई, सातारा, अमरावती आदी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर न केल्याने येथील उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत पेच कायम आहे.

भाजपने सोलापूरमधून विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचे तिकीट कापून माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना संधी दिली आहे. त्यामुळे सोलापुरात दोन विद्यमान आमदारांमध्ये लोकसभेची लढाई होणार आहे. महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही.

उत्तर-मध्य मुंबई वगळता भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या सर्व जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. भाजपने उत्तर-पश्चिम मुंबई, अमरावती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि सातारा लोकसभेची जागा लढविण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे भाजप २८ पेक्षा जास्त जागा लढणार हे निश्चित झाले आहे. माजी मंत्री महादेव जानकर महायुतीत सहभागी झाले आहेत. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महायुतीतील समावेश निश्चित मानला जात आहे. मनसेला एक ते दोन मतदारसंघ सोडण्यात येतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अपेक्षित जागा मिळणार का हे पाहावे लागणार आहे. भाजपने पाचव्या यादीत भंडारा-गोंदिया येथून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने भंडारा-गोंदियावर दावा केला होता. मात्र, भाजपने उमेदवार जाहीर करून राष्ट्रवादीचा दावा फेटाळून लावला. गडचिरोली-चिमूरमधून विद्यमान खासदार अशोक नेते यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे.

पूनम महाजन यांचे तिकीट कापले जाणार?

भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन प्रतिनिधित्व करत असलेल्या उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवार जाहीर केलेला नाही. उमेदवारीला विलंब होत असल्याने पूनम महाजन यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळेल का यावरील प्रश्नचिन्ह गडद झाले आहे. या मतदारसंघातून भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अमरावतीत नवनीत राणा यांच्या विरोधात शिंदे गट तसेच माजी मंत्री बच्चू कडू यांच्यात नाराजी आहे. त्यामुळे भाजपकडून नवा पर्याय दिला जाऊ शकतो.

logo
marathi.freepressjournal.in