राजा माने/मुंबई
काँग्रेसमधून बडे नेते बाहेर पडत असल्याने काँग्रेस पक्षात खळबळ उडाली असून, पक्ष ताकदीने उभा करून पुन्हा आगामी निवडणुकांना कसा सामोरे जाईल, यादृष्टीने काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यादृष्टीने प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेस नेत्यांसह शरद पवार यांची भेट घेऊन पक्ष विलिनीकरणाचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा होती. त्यातच शरद पवार गटाची बुधवारी पुण्यात मोदीबाग येथे बैठक झाली. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चा रंगल्या. मात्र, शरद पवार गटाने ही शक्यता फेटाळली आहे. तसेच ही बैठक निवडणूक चिन्हासह आगामी लोकसभा निवडणुकीला कसे सामोरे जायचे, यावर चर्चा करण्यासाठी पार पडल्याचे सांगण्यात आले.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद मोठी आहे. परंतु, भाजप वाढवायची असेल, तर आव्हान उभे करणारे पक्ष विकलांग करायचे आणि निवडणुकीला सामोरे जायचे, हाच सध्या भाजपचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. यातूनच शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी फुटली. त्यामुळे महायुती भक्कम झाली. मात्र, अजूनही फोडाफोडी सुरू असून, आता काँग्रेसचे मोहरे टिपण्याचे काम सुरू आहे. यातूनच काँग्रेसचे बडे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे काँग्रेसला हा फार मोठा धक्का आहे. कारण काँग्रेस पक्षात त्यांचे समर्थन करणारे आमदार बरेच आहेत. त्यामुळे त्यांना कसे थोपवायचे आणि आगामी निवडणुकांत काँग्रेसचे ऐक्य कसे वाढवायचे, याचे काँग्रेससमोर आव्हान उभे आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ठाम असल्याचे दिसत आहे. मात्र, चव्हाण समर्थक आमदार आज ना उद्या बाहेरचा रस्ता धरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. यावेळी चेन्नीथला यांनी त्यांच्यासमोर थेट काँग्रेसमध्ये विलीन व्हावे. आपण सर्व मिळून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव ठेवल्याचे समजते. दरम्यान, बुधवारी सकाळी पुण्यातील मोदीबाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला सर्व नेते उपस्थित असल्याने शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीनिकरणावर मंथन सुरू असल्याची चर्चा रंगली. त्यामुळे पुन्हा शरद पवार यांच्या नव्या गेमवरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली. मात्र, इतक्या सहजासहजी शरद पवार माघार घेणार नाहीत, याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला.
दरम्यान, बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही शक्यता फेटाळून लावली. यासोबतच खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांनीही ही शक्यता फेटाळली. शरद पवार यांचे नेतृत्व संपूर्ण राज्याला मान्य आहे. त्यामुळे आम्ही आगामी निवडणुका शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली लढणार आहोत. सुप्रीम कोर्टाने पक्षाचे मूळ नाव, चिन्ह नाही दिले तर पक्षाचे नवे नाव, चिन्ह घेऊन लढू, असे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. तसेच माजी मंत्री अनिल देशमुख यांनीही विलीनिकरणाच्या बातम्यांत कुठलीही सत्यता नाही, असे स्पष्ट केले.
न्यायालयीन प्रकरणांवर चर्चा
शरद पवार गटाच्या पक्षाला तात्पुरते नाव मिळाले आहे. परंतु, अद्याप पक्षाचे चिन्ह काय, हा प्रश्न आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीला कसे सामोरे जायचे, महाविकास आघाडीचा कार्यक्रम कसा राहील, यावर शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे समजते.
बांदल यांच्यामुळे वाढला संशय
शरद पवार गटाची ही बैठक सुरू असताना शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल हे बैठकीतून बाहेर पडले. त्यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बांदल यांनी वरिष्ठ पातळीवर वेगवेगळ्या चर्चा सुरू असतात. विलीनीकरणाचीही चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे, असे मोघम उत्तर दिले. त्यामुळे या चर्चेला बळ मिळाले. मात्र, शरद पवार गटाने आम्ही स्वतंत्रच लढणार असल्याचे सांगितले.