
सुजीत ताजणे/छत्रपती संभाजीनगर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सोमवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता माध्यमांशी संवाद साधताना ऐतिहासिक वादांवर ठाम भूमिका घेतली. काही मंडळींनी पुन्हा एकदा औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुढे आणल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्टपणे सांगितले, औरंगजेबाच्या कबरीला अनावश्यक महत्त्व दिले जात आहे. अशा जुन्या मुद्यांनी समाजात दरी निर्माण होऊन समाज दुभंगतोय, अशा प्रकाराची कोणतीही गरज नाही. राज्याच्या भविष्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची ही वेळ आहे, असा रोखठोक सल्ला देत त्यांनी जुन्या वादांना हवा देणाऱ्यांना चपराक लगावली आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीला महत्त्व देणं, त्यावर वाद घालणं यातून काही साध्य होणार नाही. त्यापेक्षा राज्यातील तरुणांसाठी रोजगार निर्माण करणे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि बीड येथे इनोव्हेशन सेंटर सुरू करणार आहोत.
टाटा समूहासोबत करार करून या केंद्रांमध्ये डेटा सायन्स, आधुनिक शेतीतंत्रज्ञान यावर काम करून तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करू.
छत्रपती संभाजीनगर ला मोठे उधोग येत आहे. इथल्या तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील असेही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणात सवलत मिळाल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांना फायदा होईल, याकडेही अजित पवारांनी लक्ष वेधले.
फूट टाकणाऱ्यांना महत्त्व नकोच!
राज्यात अशा वादग्रस्त विषयांवरून निर्माण होणाऱ्या तणावांबाबत अजित पवार म्हणाले, धर्म, जात, इतिहास याच्या नावावर समाज दुभंगवण्याचे काम काही मंडळी करत आहेत. आम्ही त्यांना पाठिशी घालत नाही. राज्य सरकारचा विकासावर भर आहे रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार हेच आमचे प्राधान्य आहे. काहींना समाजात तणाव निर्माण करायचा आहे, त्यांनी हे जुनाट मुद्दे काढले आहेत. पण आम्ही ते होऊ देणार नाही. महाराष्ट्राचा विकास, तरुणांचा रोजगार, शेतकऱ्यांची प्रगती यासाठीच आमचा वेळ आणि शक्ती खर्च होणार आहे. औरंगजेबाच्या कबरीला महत्त्व देण्याची गरज नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली बोराडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. प्राचार्य बोराडे यांच्या निधनानंतर सहवेदना व्यक्त करण्यासाठी पवार आले होते. प्राचार्य बोराडे यांच्या निवासस्थानी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. प्राचार्य बोराडे यांच्या पत्नी सुलभा बोराडे, कन्या प्रेरणा दळवी, तृप्ती इंगळे, हर्षवर्धन दळवी, पृथ्वी इंगळे, तसेच आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे यावेळी उपस्थित होते.