अजित पवारांसारखा कृतघ्न कोणीही नाही! आव्हाड यांची सडकून टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मरणाची वाट बघणारे अजित पवार हे बारामतीकरांना आणि महाराष्ट्राला कधीच आवडणार नाही, अशी सडकून टीका माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे.
अजित पवारांसारखा कृतघ्न कोणीही नाही! आव्हाड यांची सडकून टीका
PM

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मरणाची वाट बघणारे अजित पवार हे बारामतीकरांना आणि महाराष्ट्राला कधीच आवडणार नाही, अशी सडकून टीका माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे. ठाण्याच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, ज्यांनी पोरासारखे वाढवले. त्या माऊलीचे कुंकू पुसायला निघालात का? अजित पवारांसारखा कृतघ्न कोणीच नाही, या शब्दांत आव्हाड यांनी अजित पवारांवर संताप व्यक्त केला आहे. बारामतीसाठी मी हे केले, ते केले, असे सांगणाऱ्या अजित पवारांना बारामती दिली कोणी? असा टोलाही आव्हाड यांनी लगावला.

आव्हाड म्हणाले की, एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणे कितपत योग्य आहे. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. अजित पवार यांनी हद्द ओलांडली. आपली उंची ओळखा. कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही. अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग हे देखील त्यांचे नाव काढतात. लाज वाटते मला तुमच्यासोबत काम केल्याची, अशी कडवट टीकाही त्यांनी केली.

खरी चूक ही साहेबांची आहे. त्यांनी अजित पवारांना कधी ओळखले नाही. येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील, असा टोला आव्हाड यांनी लगावला.

आव्हाडांच्या निवासस्थानी बॉम्बची अफवा

आव्हाड यांच्या ठाण्यातील ‘नाद’ या बंगल्यात शनिवारी रात्री बॉम्ब असल्याचा एक निनावी फोन आल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर बॉम्बशोधक विभागाने तपासणी केली, पण काहीही निष्पन्न झाले नाही.

logo
marathi.freepressjournal.in