
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबत घेत शिंदे सरकारशी हातमिळवणी केली. यानंतर रविवारी (२जुलै) उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील ८ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या झालेल्या शपथविधीला आपला पाठिंबा नसल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. यानंतर राष्ट्रवादीत अजित पवार विरुद्ध शरद पवार असा गट दिसून आला. आज अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्धघाटन देखील केलं.
अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज मंत्रालयात हजेरी लावली. यावेळी अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं. पंतप्रधान मोदी यांच्या इतका दुसरा मोठा राजकीय नेता कुणीच नाही, त्यांच्याशिवाय देशाला पर्याय नसल्याचं राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. शपथविधीनंतर झालेल्या पहिल्याचं कॅबिनेटच्या बैठकीला अजित पवार हे त्यांच्या आठही मंत्र्यांसह उपस्थित राहीले.
रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासकामांमुळे सरकारमध्ये सामील झाल्याचं भुजबळ म्हणाले होते. यावेळी अजित पवार यांनी देखील मोदी यांचं तोंडभरुन कौतूक करत देश त्यांच्यामुळेच आगेकूच करत असल्याचं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य वेगळ्या विचारांचं असतं तर विकास कामात आणि निधीत कमतरता राहाते, त्यामुळे आम्ही सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, असं अजित पवार यांनी सांगितलं होतं.