
बीड : राजकीय जीवनात चढउतार येतच असतात, त्यांना सामोरे जायचं असतं. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. आम्ही जरी युती सरकारमध्ये असलो तरी सर्व जाती-धर्मात जातीय सलोखा राखला गेला पाहिजे. जनतेला हे सरकार आपलं आहे, हे आम्ही कृतीतून दाखवून देऊ, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी येथील उत्तर सभेत केले.
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी बीड येथे सभा घेतली होती. या सभेला उत्तर देण्यासाठी म्हणून अजित पवार यांनी ही सभा घेतली. अजित पवार म्हणाले, ‘‘विरोधक सातत्याने दिशाभूल करत आहेत. कांदा प्रश्न निर्माण झाल्यावर आम्ही धनंजय मुंडे यांना दिल्लीत जाऊन पियुष गोयल यांची भेट घेण्यास सांगितले. मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने पियूष गोयल यांच्याशी बोलत होतो. त्यानंतर २४१० रुपये प्रती क्विंटल भाव दिला. २ लाख क्विंटल कांदा आम्ही खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याच्या शिवारात पाणी आल्याशिवाय शांत बसणार नाही. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवल्याशिवाय मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटणार नाही. १ लाख कोटी रुपये लागले तरी चालतील, मराठवाड्याला पाणी द्यायचा निर्णय घेतला आहे. जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत असणे गरजेचे आहे. म्हणुन आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
काहीजणांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. परंतू, मी त्यावर बोलणार नाही. मी काम करणारा माणूस आहे. कामाला पहाटे सुरुवात करतो, काम करणे ही आपली पॅशन आहे. २०१२ पासून धनंजय माझ्यासोबत काम करत आहे. कायम त्यांच्यावर संघर्ष करण्याची वेळ आली. २०१४ पासून विरोधी पक्षनेता म्हणुन काम करतो. महाविकास आघाडीत मंत्री असतांना त्याने वाड्यावस्त्यांची जातीवादी नावं बदलण्याचा धाडसी निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
‘‘आम्ही निवडणुकीपुरती आश्वासने देणार नाही. निवडणुका येतील, जातील. मागचा अनुभव पहाता आम्ही कायम कामावर लक्ष दिलं आहे. केंद्र आणि राज्य एका विचाराचे आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या चांगल्या ओळखी झाल्या आहेत. याचा फायदा करायचा आहे. चांगली कामे करायची आहेत. आम्ही विकास करण्यासाठी महायुतीच्या सरकारमध्ये गेलो आहोत. आमचा कुठला स्वार्थ नाही. कारण नसताना वेगळ्या चर्चा करतात यामध्ये तथ्य नाही, असेही पवार यांनी सांगितले.
‘‘साहेब तुमच्याबरोबर जे लोक भाषणं करत आहेत, त्यांना विचारा भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी ५४ जणांनी सह्या केल्या. आता जे भाषणं करत आहेत त्यांना विचारा सह्या केल्या की नाही, असे छगन भुजबळ म्हणाले. तुम्ही अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांना दिल्लीला जायला सांगितलं. त्यांना वाटाघाटी करायला सांगितले. त्यावेळी मी आणि धनंजय मुंडे नव्हतो. माझ्या मतदार संघात आलात त्यावेळी तुम्ही म्हणालात की माफी मागतो की, मी भुजबळांना इथून उभे केले. आता गोंदिया पासून कोल्हापूर पर्यंत ५४ ठिकाणी सर्वांची माफी मागणार का? असा सवाल भुजबळांनी केला.
साहेब, भांडण मिटवून टाका- भुजबळ
राष्ट्रवादी पक्ष कुणाकडे आहे आणि अध्यक्ष कोण, हे आजची सभा पाहिली तर लक्षात येईल. पक्षाचे अध्यक्ष हे अजित पवारच असल्याचे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. शरद पवार यांची पहिली सभा छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात, दुसरी धनंजय मुंडे, तिसरी हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात झाली. पण ज्यावेळी बारामतीचा विषय आला, त्यावेळी शरद पवार म्हणाले की, अजित पवार आमचे नेते आहेत. ते नेते आहेत म्हणता तर मग उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना मान्यता द्या आणि भांडण मिटवून टाका, असेही छगन भुजबळ म्हणाले.