जागा वाटपासाठी सहा जणांची समिती ; आमदार अपात्रतेवर वेगळ्या निर्णयाची शक्यता नाही - अजित पवार

जागा वाटपासाठी सहा जणांची समिती ; आमदार अपात्रतेवर वेगळ्या निर्णयाची शक्यता नाही - अजित पवार

आमदार अपात्रतेबाबत वेगळा निर्णय लागण्याची शक्यता नाही. वेगळा निर्णय लागला तरी सरकारला धोका नसल्याचेही अजित पवार म्हणाले

लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर निवडणुका लागल्यावर धावपळ व्हायला नको, म्हणून विधानसभा जागांबाबतही आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. आघाडीतील घटक पक्षातील प्रत्येकी दोन नेते अशा एकूण सहा जणांची समिती नेमून जागा वाटपावर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार अपात्रतेबाबत वेगळा निर्णय लागण्याची शक्यता नाही. वेगळा निर्णय लागला तरी सरकारला धोका नसल्याचेही अजित पवार म्हणाले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शरद पवार यांनी रविवारी तातडीने महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागांचे वाटप करुन कोणत्या जागा कुणी लढवाव्यात, यावर सविस्तर बैठकीत झाली. लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर निवडणुका लागल्यावर धावपळ व्हायला नको, म्हणून विधानसभा जागांबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे पवार म्हणाले. निवडणुकांतील जागा वाटप म्हटल्यावर तिन्ही पक्ष नावे देणार आहेत. त्यातून बैठक होईल. त्यासाठी तिन्ही पक्षातील दोघेजण, अशी सहा जणांची समिती स्थापन करून पुढच्या लोकसभेच्या ४८ जागा व विधानसभेच्या २८८ जागांचे वाटप कसे करायचे. याशिवाय फक्त तीनच पक्ष नाही तर या तिन्ही पक्षांशी संबंधित मित्रपक्ष आहेत, त्यांनाही जागा वाटपात बरोबर घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

कर्नाटक निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची रणनीती काय असली पाहिजे आणि वज्रमूठ सभा कशापद्धतीने झाली पाहिजे, यावर चर्चा झाली. याशिवाय मागच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करुन निवडणूका लढवल्या होत्या. यावेळी महाविकास आघाडी करुन शिवाय आघाडीच्या बरोबर असलेल्या छोट्या राजकीय पक्षांना घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय बैठकीत हल्ल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविण्याच्या याचिकेवर वेगळा निर्णय लागण्याची शक्यता नाही, अशी शंका अजित पवार यांनी व्यक्त केली. जरी वेगळा निर्णय लागला तरी राज्यातील सरकारला कोणताही धोका नाही. १६ आमदार अपात्र ठरले तर विधासभेतील संख्याबळ २७२ होईल. अशावेळी बहुमताचा आकडा १३७ वर जाईल. सध्या सरकारकडे त्यापेक्षा अधिक आमदार आहेत, असेही पवार म्हणाले.

अकोल्यातील दंगलीचा सुत्रधार शोधा

अकोला शहरात शनिवारी मध्यरात्री दोन गटात राडा झाला. याबाबत पवार यांनी अकोल्यातील घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ‘‘हे आज एका ठिकाणी झाले, उद्या ते दुसरीकडे होऊ शकते. अशा गोष्टी पसरायला वेळ लागत नाही. या दंगलीला कारणीभूत ठरणारी क्लीप कुणी व्हायरल केली, यामागचा सूत्रधार कोण होता आणि त्याचा उद्देश काय होता, याची शहानिशा राज्य सरकारने करावी. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस यंत्रणेकडे असते. पोलिस यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप न होता अशा प्रकारच्या चौकशा पूर्ण करण्यासाठी मुभा दिली तर पोलीस यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करू शकते. हा पाठीमागचा अनुभव आहे, असेही अजित पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in