- अरविंद भानुशाली
मतं आणि मतांतरे
महाआघाडी व महायुतीमधील जागेचा तिढा अजून सुटला नसला तरी महायुतीमधील भाजपने २३ उमेदवार जाहीर करून प्रचार मोहीम सुरू केली आहे. महाआघाडीतून बहुजन वंचित आघाडी जवळ जवळ बाहेर पडली असून रासपने महायुतीत समाविष्ट होऊन वापसी मिळविली आहे. तर मनसेने जवळ जवळ महायुतीत होण्याचे संकेत स्पष्ट शब्दात दिले आहेत. काँग्रेस महाआघाडीस ‘वंचित’ २०१९ प्रमाणे मोठा फटका देऊ शकतो. त्यात एमआयएम हा पक्षही स्वतंत्रपणे लढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या तरी महाविकास आघाडीची परिस्थिती बदललेली दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी उबाठाचे उद्धव ठाकरे यांची मातोश्रींवर जाऊन दीडतास चर्चा केली. तर इकडे महायुतीमधील अमरावतीच्या जागेवरून शिवसेना (शिंदे गट) माजी खा. आनंद अडसूळ व प्रहारचे बच्चू कडू यांनी दंड थोपटले आहेत. तेथे भाजपाने नवनीत राणा यांना पाठिंबा दिल्याने युतीमध्ये ही मिठाचा खडा पडला आहे.
महायुतीमध्ये भाजप नेमकी किती जागा लढवणार आहे हे अजूनही जाहीर झालेलं नाही. मात्र त्यांनी दोन्ही मित्र पक्षांवर आघाडी मिळविली असून २३ लोकसभा मतदार संघात उमेदवार जाहीर करून प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. महायुतीमध्ये ठाणे, नाशिक वरून वाद सुरू आहेत. शिवसेनेने (शिंदे गट) पालघरची त्याच्या बदल्यात ठाण्याची जागा व नाशिकची जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे रविवारी धुलीवंदनाच्या दिवशी शिंदे गटाचे खासदार गोडसे यांनी ठाणे येथे येऊन आपल्या समर्थकांसह आवाज उठवला.
खरे पाहिल्यास वंचित आघाडीने महाआघाडीत जाण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. मुंबई येथे झालेल्या शिवाजी पार्कमधील जाहीर सभेतही प्रकाश आंबेडकर यांनी भाग घेतला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने महायुतीमध्ये घबराट पसरली होती हे नाकारता येणार नाही. वंचितला ७ जागा हव्या आहेत. परंतु शिवसेनेने एकतर्फीच चार जागा देण्याचे मान्य केले होते व तसे सुतोवाच उबाठाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी दिले होते. बारामतीमध्ये पवारांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शड्ड ठोकले आहे. काँग्रेसमध्ये दिवसेंदिवस गटबाजी उघड होत आहे. मुंबईचे मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही भाजपात प्रवेश केला. महाआघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार, शिवसेना, उबाठा यांच्यात एक मत होत नाही. काँग्रेसने मात्र लोकसभा निवडणुकीसाठी चार जागांची नावेही जाहीर केली आहेत. तर इकडे राष्ट्रवादीमध्ये शिरूरच्या जागेवर डॉ. अमोल कोल्हे, बारामतीच्या खा. सुप्रिया सुळे यांची नावे जाहीर केली आहेत.