दिवाळी शिधा वाटपाचे सरकारकडून गाजर !

दिवाळी आली तरी चार शिधा जिन्नसांचा साठा पोहोचलाच नाही!
दिवाळी शिधा वाटपाचे सरकारकडून गाजर !

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त ४ शिधाजिन्नसांचा समावेश असलेल्या अन्न संचाच्या वितरणाची घोषणा राज्य शासनाने केली आहे. मात्र, दिवाळीपूर्वी या शिधाजिन्नसांचा पुरवठाच झाला नाही, परिणामी जिल्ह्यातील ४ लक्ष ४८ हजार लाभार्थ्यांना दिवाळीच्या तोंडावरच संचाचे वितरण रखडल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. त्यामुळे दिवाळी शिधा वाटपाचे सरकारकडून गाजर दाखविण्याच्या चर्चा रायगड जिल्ह्यात सुरु आहे. जिल्ह्यातील पात्र शिधा पत्रिका धारकांची संख्या ४ लक्ष ४८ हजार इतकी असून याचा लाभ १७ लक्ष ६० हजार लोकसंख्येला होणार आहे.

राज्य सरकारनं दिवाळीनिमित्त गोरगरीबांना शिधा देण्याचा निर्णय घेतला. चार शिधा जिन्नस यामध्ये १ किलो मैदा, १ किलो साखर, १ किलो पामतेल, १ किलो चनाडाळ यांचा समावेश आहे. हा शिधा किट वितरणाचे कंत्रात महाराष्ट्र कंझूमर फेडरेशन या कंपनीला देण्यात आले. ठरावित कालावधीत टप्पे निहाय संबंधित वस्तू दिवाळी पूर्वी राज्यातील सर्वच गोदामात संच पोहोचणे आवश्यक होते. जिल्ह्यात १५ तालुक्यांसाठी २१ गोदामे आहेत. १५ पैकी १० तालुक्यातील शिधा वितरण केंद्रांवर हे किट पोहोचले आहेत मात्र ५ तालुक्यातील वितरण केंद्रांवर हे किट अद्यापपर्यंत पोहोचलेच नाहीत. आज संध्याकाळी हे किट पोहोचतील अशी माहिती रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी "नवशक्ति" ला दिली.

सूत्रांच्या माहिती नुसार अर्धवट आणि अपुऱ्या मालामुळे अनेक ठिकाणी संचाचे वितरण रखडले आहे. त्यामुळे लाभार्थी आणि स्वस्त धान्य दुकानदारामध्ये खटके उडत आहेत. त्याचवेळी संच वितरणाला वेळेचे बंधन आल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना स्वत:च संच तयार करावा लागणार असल्याची आपातकालीन परिस्थिती रायगड जिल्ह्यात निर्माण झाली आहे. तथापि, गरीबांची दिवाळी ‘गोड’ करण्या ऐवजी पुरवठादाराचीच दिवाळी ‘गोड’ केली जाणार असल्याची जाणीवपूर्वक वेळ सरकारने आणली तर नाही ना? असा प्रश्न सामान्यांमध्ये उपस्थित होत आहे.

काही ठिकाणी डाळ तर काही ठिकाणी मैदा नाही!

जिल्ह्यातील २१ गोदामांवर कुठे चणा डाळ पोहोचली आहे. तर कुठे मैदाचा साठा उपलब्ध आहे. मात्र, त्याचवेळी कुठे तेल तर कुठे साखरेचा तुटवडा आहे. चारही शिधा जिन्नस आणि त्यांचा संच कुठेही उपलब्ध नसल्यामुळे दिवाळीपूर्वी संच वितरीत करायचे तरी कसे? असा पेच पुरवठा विभागाच्या समोर उभा राहीला आहे.

logo
marathi.freepressjournal.in