नागपूर : देशात जातनिहाय जनगणना होणारच आणि त्यामधून दलित, इतर मागासवर्ग आणि आदिवासींवर झालेला अन्याय स्पष्ट होईल, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान सन्मान’ संमेलनात ते बोलत होते.
जातनिहाय जनगणनेमुळे सर्व सुस्पष्ट होईल, प्रत्येकाला आपल्या ताकदीची आणि आपल्या भूमिकेची जाणीव होईल. जातनिहाय जनगणना हा विकासाचा नमुना आहे, आम्ही आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादाही उठवू, देशातील जवळपास ९० टक्के उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढत असल्याचे आपल्याला देशाला सांगावयास लागेल, असेही गांधी म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना म्हणजे केवळ एक पुस्तक नाही तर जीवनाचा मार्ग आहे, जेव्हा भाजप आणि रा. स्व. संघाचे लोक घटनेवर हल्ला करतात, तेव्हा ते देशाचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. अदानी कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये तुम्हाला एकही दलित, इतर मागासवर्ग आणि आदिवासी व्यक्ती दिसणार नाही. सरकारने केवळ २५ लोकांसाठी १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, परंतु आपण जेव्हा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी आवाज उठविला तेव्हा आपल्यावर टीका करण्यात आली, असेही लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणाले. जातनिहाय जनगणनेचा खरा अर्थ न्याय आहे. आपल्या देशात ९० टक्के लोकांकडे काही अधिकार किंवा पैसे नाहीत तर मग त्यांचा अर्थ काय, मला वाटते की सत्ता, पैसा नसेल तर आदर या गोष्टीला काय अर्थ आहे, जो माणूस भुकेलेला आहे, गरजवंत आहे त्याला आदर देऊन काय करणार, त्याऐवजी त्याला सक्षम बनवा. आदर तो कमवेल, असे राहुल गांधी म्हणाले.
संघ, भाजपवर टीका
जातनिहाय जनगणना हा आवाज जेव्हा वाढला तेव्हा मोदींची झोप उडाली. मी तुमचे ऐकून घेतो, माझे लक्ष्य हे आहे मला काहीही नको. लोकांसाठी जे करायचे ते करायचे आहे. भारतातील गरीबांचा आवाज ऐकणे हे माझे काम आहे, असेही ते म्हणाले. संघ आणि भाजपचे लोक हे विकास, प्रगती असे शब्द आणून संविधान मारण्याचे काम करत आहेत, असेही गांधी म्हणाले.
दीक्षाभूमीला भेट
दरम्यान, राहुल गांधी यांचे येथे आगमन झाल्यानंतर दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी अभ्यागतांसाठी ठेवलेल्या पुस्तकामध्ये आपला अभिप्रायही नोंदविला.
डॉ. आंबेडकरांच्या विचारसरणीला राहुल यांचा विरोध - बावनकुळे
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीला विरोध असून ते घटनेचे संरक्षण करण्याचे नाटक करीत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. काही शहरी नक्षलवादी जनतेला देशाविरुद्ध चिथावणी देत आहेत, राहुल गांधी यांचा संविधान सन्मान संमेलनाचा कार्यक्रम बंद दरवाजामागे का आयोजित करण्यात आला, असा सवालही बावनकुळे यांनी केला. मात्र काँग्रेसने या आरोपाचा इन्कार केला आहे.
पाच टक्के लोक देश चालवत आहेत
पाच टक्के लोक देश चालवत आहेत. शेअर बाजार वधारला की या लोकांचा फायदा होतो. १६ लाख कोटी रुपये माफ केले गेले त्यावर कुणीही काहीही बोलले नाही. मी कर्नाटकात बोललो, मला सगळे आरसा दाखवत आहेत. कुणीही ९० टक्क्यांबाबत बोलले की त्यांच्यावर टीका होते. शेतकऱ्याने कर्ज परत केले नाही तर त्याला कर्जबुडव्या म्हणत तुरुंगात पाठवतात. अदानी १ लाख कोटी बुडवतात त्यांना देशभक्त म्हटले जाते. एकाला डिफॉल्टर बनवले जाते, तर दुसऱ्याला व्यावसायिक म्हटले जाते. शेतकरी तुरुंगात जातो आणि दुसरा अदानीसारखा माणूस प्रायव्हेट जेटने परदेशात जातो. याला विकास म्हटले जाते.