उद्योजकांना समस्या येऊ देणार नाही: राहुल भिंगारे; महाराष्ट्र औद्योगिक विकास ६२ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा

कोल्हापूर विभागामार्फत ०१ ऑगस्ट रोजी एमआयडीसीचा ६२ वा वर्धापन दिन हॉटेल पॅव्हेलियन मध्ये विविध कार्यक्रम व स्पर्धांनी उत्साहात पार पडला.
उद्योजकांना समस्या येऊ देणार नाही: राहुल भिंगारे; महाराष्ट्र औद्योगिक विकास ६२ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा
Published on

शेखर धोंगडे/कोल्हापूर : कोल्हापूर विभागामार्फत ०१ ऑगस्ट रोजी एमआयडीसीचा ६२ वा वर्धापन दिन हॉटेल पॅव्हेलियन मध्ये विविध कार्यक्रम व स्पर्धांनी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील उपस्थित होते.

प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे यांनी नवीन भूसंपादन करून उद्योजकांना उद्योग विस्तारासाठी भूखंड उपलब्ध करून देणे तसेच उद्योजकांना कोणतीही समस्या निर्माण होऊ देता आमच्या विभागातर्फे आगामी काळातही पूर्णता सहकार्य केले जाईल, असा विश्वास दिला. सातारा येथे पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे मुंबईला जोडणारा उद्योग झोन विकसित होणार असल्याचेही भिंगारे म्हणाले.

राज्य शासनाच्या विविध उद्योग विश्वासाठी असणाऱ्या योजना या येत्या तिसऱ्या पिढीतील उद्योजकांपर्यंत पोचवण्यास एमआयडीसी ही स्वायत्त संस्था कार्यरत आहे. नवनवीन संकल्पना घेऊन उद्योग व्यवसाय अधिक व्यापक करू, युवा उद्योजकांना प्रेरित करून उद्योजक बनवण्याचेही स्वप्न साकारू या असे भिंगारे यांनी सांगितले.

कार्यक्रमास स्मॅक चे चेअरमन सुरेन्द्र जैन, व्हाईस चेअरमन जयदीप चौगले, गोशिमा चे अध्यक्ष नितीनचंद्र दळवाई, उपाध्यक्ष स्वरूप कदम, मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, कोषाध्यक्ष सुरेश शिरसागर, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे ऑ. सेक्रेटरी प्रसन्न तेरदाळकर, कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनियरिंग क्लस्टर चे अध्यक्ष दीपक चोरगे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स चे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे व औद्योगिक संघटनांचे संचालक, निमंत्रण सदस्य, उद्योजक उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक यांनी उद्योजक हा केंद्रबिंदू मानून दर्जेदार सुविधा आणि त्यांच्या अडचणींना सोडविण्यास सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम करावे अशा भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्रास धडाडीचे उद्योग मंत्री लाभल्याने पायाभूत सुविधांची बरीच कामे करता आल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. महाराष्ट्र शासन आणि संपूर्ण महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतचे उद्योजकांचे समन्वयाचे आणि त्यांच्या विकासासह महाराष्ट्राची ही उद्योगशील प्रतिमा अधिक व्यापक करण्यासाठी एमआयडीसी कार्यरत असून ६२ व्या वर्षात पदार्पण करताना अधिकाधिक प्रभावीपणे नवनवीन योजनांचं कार्य करण्याचा निर्धार करत आहे.

सर्व औद्योगिक संघटनांनी एमआयडीसी कडून उत्तम सहकार्य असल्याचे मनोगत व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हरिचंद्र थोत्रे यांनी महाराष्ट्रास धडाडीचे उद्योग मंत्री लाभल्याने १५६ कोटींचा निधी कोल्हापूर जिल्ह्याला दिला व मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्याचे मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक करताना उपअभियंता अजयकुमार रानगे यांनी एका वागळे इस्टेट या क्षेत्रापासून सन १९६२ साली सुरु झालेली एमआयडीसी आज राज्यात २८९ औद्योगिक क्षेत्रे कार्यरत आहेत व आशिया खंडातील सर्वात मोठे पाणीपुरवठा वितरण जाळे निर्माण कसे निर्माण केले याचा प्रवास वर्णन सांगितला.

डीआयसीचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून विज्ञान शाप की वरदान यावर विज्ञान व तंत्रज्ञान उपयोगी आहे, पण त्याचा अतिरेकी वापर उदाहरणार्थ मोबाईल व त्यातील गेम्स चा अतिरेकी वापर घातक असल्याचे व भावी पिढी‌ सुसंस्कृत‌ करण्याच्या दृष्टीने त्यावर नियंत्रण ठेवणे ‌काळाची गरज असल्याचे नमूद केले.

यावेळी स्पर्धा व शालेय परीक्षेत यश मिळवलेले विधार्थी तसेच विविध उद्योग व्यवसायात नवीन गॅजेट्स सह यशस्वी झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी उप अभियंता कागल सुनिल अपराज यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश कुरणे यांनी केले. कार्यक्रमास कोल्हापुर विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in