
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील थेरोंडा-पालव या दोन गावांना जोडणारा महत्त्वाचा साकव गुरुवारी कोसळला. ज्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांचा उद्रेक झाला आहे.
गेले अनेक महिने या साकवाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली होती. काँग्रेस नेते अशोक आंबुकर यांनी यासंदर्भात वेळोवेळी प्रशासनाला लेखी निवेदने देऊन, प्रत्यक्ष भेटून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते. जर या साकवाची वेळीच दुरुस्ती केली नाही किंवा नवीन बांधकाम केले नाही, तर मोठी दुर्घटना अटळ आहे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता. मात्र, संबंधित विभागाने याकडे पूर्णपणे काणाडोळा केला, ज्याचा परिणाम म्हणून आज हा साकव कोसळला.
थेरोंडा आणि पालव या गावातील शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि शेतकऱ्यांसाठी हा साकव जीवनवाहिनीसमान होता. दररोज शेकडो नागरिक याच मार्गावरून जीव धोक्यात घालून प्रवास करत होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला आणि आधीच कमकुवत झालेला हा साकव अखेर कोसळून पडला.
या घटनेमुळे जिल्ह्यातील इतरही धोकादायक पूल आणि साकवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप
आम्ही वारंवार तक्रारी केल्या, नेत्यांनी निवेदने दिली, पण प्रशासन मोठी दुर्घटना होण्याचीच वाट पाहत होते का? दुर्घटनेपूर्वीच जर यावर उपाययोजना झाली असती, तर आज ही वेळ आली नसती, अशा संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांमधून उमटत आहेत. प्रशासनाच्या या गलथान कारभाराचा तीव्र निषेध करत, जर तात्काळ नव्या साकवाच्या कामाला सुरुवात झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.