"त्यांना खुर्चीची उब मिळेल, परंतु गद्दारीचा..." उद्धव ठाकरेंचा दीपक केसरकरांवर निशाणा

"ते डबल गद्दार आहेत. आठवड्यातून पंधरावड्यातून शिर्डीला जात असल्याने एक चांगला माणूस म्हणून मी त्यांना..."
"त्यांना खुर्चीची उब मिळेल, परंतु गद्दारीचा..." उद्धव ठाकरेंचा दीपक केसरकरांवर निशाणा

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या कोकणदौऱ्यावर आहेत. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सावंतवाडीतील गांधी चौकात आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला. "दीपक केसरकर यांना मी मोठ्या अपेक्षेने शिवसेनेत घेतले. त्यांना मंत्रिपद दिले, परंतु ते डबल गद्दार निघाले. आज ते सत्तेत असतील, त्यांना खुर्चीची उब मिळेल. परंतु, त्यांच्या कुटुंबीयांना लागलेला गद्दारीचा डाग कधीही पुसला जाणार नाही", अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच, ते इमानदार होऊच शकत नाही, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

"ते डबल गद्दार आहेत. आठवड्यातून पंधरावड्यातून शिर्डीला जात असल्याने एक चांगला माणूस म्हणून मी त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतला. ते चांगले काम करतील असे वाटले म्हणून त्यांना मंत्रिपद दिले. परंतु त्यांच्याकडे श्रद्धाही नाही आणि सबुरी नाही. त्यांनी आजपर्यंत एकाही पक्षावर श्रद्धा दाखवली नाही. आपल्याला काहीतरी मिळेल यासाठी सबुरी बाळगली नाही", असा टोला ठाकरे यांनी लगावला.

"सावंतवाडीत येणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा झाडू घेऊन सुपडा साफ करायचा आहे. गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. त्यामुळे तु्म्ही माझ्या सोबत आहात ना?", अशी भावनिक सादही त्यांनी यावेळी उपस्थितांना घातली.

आज जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी मी पुन्हा येईनच. या ठिकाणी मी 'मन की बात' नाही तर 'दिल की बात' ऐकवणार आहे. मनात काळे कपट असू शकते, पण हृदयात नाही. त्यामुळे आपण त्या पद्धतीने शिवसैनिकांशी संपर्क साधणार आहोत. एक कुटुंबप्रमुख म्हणून मी तुमच्यात आलो आहे, असेही ठाकरे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in