एकाच रुग्णावर तिसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण; एमजीएम रुग्णालयात वैद्यकीय इतिहासाची नोंद

मराठवाड्यात वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरीची नोंद करत एमजीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलने एक ऐतिहासिक आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. सरफराज मारफानी या छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असणाऱ्या ४७ वर्षीय रुग्णावर तिसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
एकाच रुग्णावर तिसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण; एमजीएम रुग्णालयात वैद्यकीय इतिहासाची नोंद
Published on

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरीची नोंद करत एमजीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलने एक ऐतिहासिक आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. सरफराज मारफानी या छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असणाऱ्या ४७ वर्षीय रुग्णावर तिसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही प्रत्यारोपण एमजीएम रुग्णालयात, एकाच डॉक्टरांच्या टीमकडून करण्यात आले आहे. अशा प्रकारची घटना मराठवाड्यात प्रथमच घडली आहे.

सरफराज मारफानी हे गेल्या १५ वर्षांपासून मूत्रपिंड निकामी होण्याच्या आजाराशी लढा देत आहेत. २०१२ मध्ये त्यांच्या आईने पहिली किडनी दान केली होती. ही किडनी ५–६ वर्षे व्यवस्थित कार्यरत राहिली. त्यानंतर २०१८ मध्ये एका कॅडेव्हर डोनरकडून दुसरी किडनी प्रत्यारोपित करण्यात आली. काही काळाने ही किडनी देखील निकामी झाल्यामुळे सरफराज पुन्हा डायलिसिसवर गेले. अखेर २०२५ मध्ये त्यांच्यावर तिसरे प्रत्यारोपण करण्यात आले असून ते देखील यशस्वी झाले आहे.

या सर्व शस्त्रक्रिया एमजीएम रुग्णालयातच करण्यात आल्या असून नेफ्रॉलॉजी विभागाच्या विभागप्रमुख डॉ.क्षितिजा गाडेकर व युरोलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ.अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. किडनी प्रत्यारोपन करणाऱ्या टीममध्ये युरोसर्जन डॉ.संदीप भाटे, अनेस्थेस्टिक डॉ.संहिता कुलकर्णी, डॉ.सुदर्शन चिंचोले, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. अनिकेत मालवे, ट्रान्सप्लांट कोऑर्डीनेटर फरहान हाश्मी आदींचा समावेश होता.

शरीरात आधीच चार किडन्या असताना पाचव्या किडनीसाठी जागा निर्माण करणे, त्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित ठेवणे, योग्य औषधोपचार करणे, ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया होती. शस्त्रक्रियेनंतर सरफराज यांच्या शरीरात आता पाच मूत्रपिंडे आहेत, मात्र त्यापैकी फक्त एकच मूत्रपिंड सक्रिय आहे असून ते व्यवस्थित कार्य करत आहे. ते काही दिवसांत एमजीएम रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन आपल्या घरी जातील.

या उल्लेखनीय यशाबद्दल एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव, सचिव अंकुशराव कदम, अधिष्ठाता डॉ.राजेंद्र बोहरा आणि उपअधिष्ठाता डॉ.प्रवीण सुर्यवंशी यांनी डॉक्टर आणि वैद्यकीय टीमचे अभिनंदन केले आहे.

जेव्हा एकही किडनी मिळणे कठीण असते, तेव्हा मला ही संधी तीनदा मिळाली. हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. माझी आई आणि इतर दोन व्यक्तींनी किडनी दान केल्याबद्दल मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहीन. विशेषत: एमजीएमच्या टीमने माझ्यावर गेले एक तप जे उपचार केले आहेत त्याबद्दल मी त्या सर्व टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. - सरफराज मारफानी, रुग्ण
logo
marathi.freepressjournal.in