साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

शरद पवार यांनी सातारा येथील उमेदवार जाहीर केल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी या चिन्हावर निवडणूक लढविण्यास नकार दिला होता.
साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
Published on

मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) वाट्याला आलेल्या १० जागांपैकी बुधवारी आणखी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा पक्षाचे नेते शरद पवार यांनी केली. त्यानुसार सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे तर रावेर लोकसभा मतदारसंघातून श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

शरद पवार यांनी सातारा येथील उमेदवार जाहीर केल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी या चिन्हावर निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. रावेर मतदारसंघातून श्रीराम पाटील आणि विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्यात लढत होणार आहे. शरद पवार गटाने आतापर्यंत नऊ उमेदवार जाहीर केले असून केवळ माढा मतदारसंघातील उमेदवार घोषित करणे बाकी आहे, ही उमेदवारी लवकरच जाहीर होणार आहे.

मोहिते-पाटील यांची शनिवारी घरवापसी?

सध्या भाजपात असलेले धैर्यशील मोहिते पाटील शनिवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मोहिते-पाटील यांच्या काही सहकाऱ्यांनी बुधवारी शरद पवार यांची भेट घेतली. धैर्यशील यांच्या पक्षप्रवेशावर त्यांनी चर्चा केली. त्या आधारावर धैर्यशील पुन्हा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटात दाखल होणार असल्याचे वृत्त आहे.

काँग्रेसकडून धुळ्यात शोभा बच्छाव तर जालन्यात कल्याण काळे

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील आणखी दोन मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसने धुळ्यातून शोभा बच्छाव तर जालनामधून डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता धुळ्यात भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांच्याविरुद्ध डॉ. शोभा बच्छाव अशी लढत होईल. तर जालन्यात भाजपचे रावसाहेब दानवेंविरुद्ध कॉंग्रेसचे डॉ. कल्याण काळे असा सामना रंगणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in