दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला,आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान!

देशभरात मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला,आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान!

मुंबई : देशभरात मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९३ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ जागांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे राज्यसभा सदस्य छत्रपती उदयनराजे भोसले, शाहू महाराज छत्रपती अशा दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडण्यासाठी राज्यातील निवडणूक यंत्रणेने आपली तयारी पूर्ण केली आहे. मतदान होत असलेल्या मतदारसंघात बहुतांशी दुरंगी लढत होत असून अनेक ठिकाणी उमेदवारांपेक्षा स्थानिक नेत्यांसाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची ठरली आहे. २ कोटींहून अधिक मतदार एकूण २५८ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडण्यासाठी राज्यातील निवडणूक यंत्रणेने आपली तयारी पूर्ण केली आहे. मतदान होत असलेल्या मतदारसंघात बहुतांशी दुरंगी लढत होत असून अनेक ठिकाणी उमेदवारांपेक्षा स्थानिक नेत्यांसाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची ठरली आहे. २ कोटींहून अधिक मतदार एकूण २५८ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत.

महाराष्ट्रात ११ जागांसाठी मतदान

तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ११ जागांवर मतदान होणार आहे.

त्यानंतर चर्चा आहे ती रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या लढाईची. येथून नारायण राणे हे भाजपच्या चिन्हावर प्रथमच निवडणूक लढवत आहेत. त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचे आव्हान आहे. राऊत हे २०१४ आणि २०१९ असे दोन वेळा निवडून आले असून कोकणी मतदार त्यांना हॅटट्रिकची संधी देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते हे तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्यात लढत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. शिवाजी कोळगे आणि भाजपचे सुधाकर शृंगारे यांच्यात सामना होत आहे. गेल्या दोन निवडणुकांत पराभव पत्करावे लागलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपली राजकीय पत राखण्यासाठी यावेळी मुलगी प्रणिती शिंदेंना सोलापूरमधून उतरविले आहे. भाजपने शिंदे यांच्या विरोधात आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या पाच लोकसभा मतदारसंघांत निकराची लढाई होत आहे. माढामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील आणि भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात लढत होत आहे. सांगलीत भाजपचे संजयकाका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेस बंडखोर विशाल पाटील अशा तीन पाटलांमध्ये तिरंगी लढत होत आहे. सातारा हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजे १९९९ पासून सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. यावेळी भाजपने राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा गड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने येथून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांना काँग्रेसच्या शाहू महाराज यांनी आव्हान दिले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने आणि शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर अशी तिरंगी लढत आहे.

शहा, सिंधिया, दिग्विजय यांचे भवितव्य ठरणार

तिसऱ्या टप्प्यातील मतदानात देशातील अनेक दिग्गज उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. त्यात केंद्रीय मंत्री अमित शहा (गांधीनगर), ज्योतिरादित्य सिंधिया (गुणा), मनसुख मांडविया (पोरबंदर), परशोत्तम रुपाला (राजकोट), प्रल्हाद जोशी (धारवाड) आणि एस. पी. सिंह बघेल (आग्रा), मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (विदिशा) आणि दिग्विजय सिंह (राजगढ) आदींचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी मैनपुरी लोकसभा जागा राखण्याचे लक्ष्य ठेवले आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवपाल यादव यांचा मुलगा आदित्य यादव बदाऊँ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत पदार्पण करत आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (हवेरी) आणि एआययूडीएफचे नेते बद्रुद्दीन अजमल (धुबरी) यांच्या भवितव्याचा निर्णयही ७ मे रोजी होणार आहे.

देशभरात ९३ जागांसाठी मतदान

दरम्यान, देशभरात तिसऱ्या टप्प्यात आसाममधील ४, बिहारमधील ५, छत्तीसगडमधील ७, दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव येथील २, गोवा येथील २, गुजरातमधील २५, कर्नाटकमधील १४, मध्य प्रदेशमधील ९, महाराष्ट्रातील ११, उत्तर प्रदेशमधील १० आणि पश्चिम बंगालमधील ४ जागांसाठी मतदान होत आहे. या ९३ जागांसाठी १,३५१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात साधारण १२० महिला उमेदवारांचा समावेश आहे.

बारामतीबाबत सर्वाधिक उत्सुकता

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. कारण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे. येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार आमनेसामने उभ्या असल्या तरी खरा संघर्ष शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यात आहे. या संघर्षातून बारामतीवर वर्चस्व कुणाचे, हे सिद्ध होणार असल्याने शरद पवार यांचा पाच दशकांचा राजकीय अनुभव पणाला लागला आहे. तसेच अजित पवार हेही सर्वशक्तीनिशी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे बारामतीची लढत सर्वाधिक चर्चेची ठरली आहे.नारायण राणे, भाजपचे राज्यसभा सदस्य छत्रपती उदयनराजे भोसले, शाहू महाराज छत्रपती अशा दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in