फसगत करणारे हे फसवे सरकार -वडेट्टीवार

दोनदा नाकारलेले आरक्षण पुन्हा तिसऱ्यांदा देणे हे म्हणजे निवडणुका मारून नेण्याचा प्रकार आहे
फसगत करणारे हे फसवे सरकार -वडेट्टीवार
Published on

मुंबई : फसगत करणारे हे फसवे सरकार आहे. मराठा समाजाची या सरकारने फसगत केली आहे. हे येणारा काळ महाराष्ट्र बघेल. यामागील कारण असे आहे की, १० टक्के आरक्षण देत असताना याला आधार कुठला हे तपासले नाही. याला कुठलाच कायदेशीर आधार नाही. हे कायद्याच्या कचाट्यात बसणारे आरक्षण नाही. ५० टक्क्यांवर आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. पण मुख्यमंत्री म्हणतात की, तसा तो अधिकार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

आम्ही विरोध केला असता तर आमच्या नावाने बोंबाबोंब केली असती, त्यामुळे आम्हाला समर्थन द्यावे लागले. वस्तुस्थिती ही आहे की, निवडणुका मारून नेण्यासाठी हे केले जात आहे. मागच्या वेळी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने तेच केले आणि आता शिंदे सरकारनेही तेच केले. निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची मते घेण्यासाठी फसवे काम या सरकारने केले आहे. दोनदा नाकारलेले आरक्षण पुन्हा तिसऱ्यांदा देणे हे म्हणजे निवडणुका मारून नेण्याचा प्रकार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in