
मुंबई : विधानसभेचा हा निकाल अविश्वसनीय आहे. आम्ही तळागाळातील कार्यकर्ते, नेते आणि पत्रकारांशी संवाद साधला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत टक्कर होईल, असे अनेकांनी सांगितलं. मात्र आज जे निकाल आले आहेत, त्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही, असे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सांगितले.
मुंबईत काँग्रेसची पत्रकार परिषद झाली. यावेळी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ते बोलत होते.
ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आजचे निकाल यात ५ महिन्यात बदल कसा होऊ शकतो, हे शक्य नाही. बेरोजगारी, महागाई आणि विद्यमान सरकारचे भ्रष्टाचार, असे अनेक मुद्दे समोर आहेत. फक्त लाडकी बहीण योजनेने हे मुद्दे संपले का? म्हणून आम्हाला या निकालांवर विश्वास नाही.”
हे परिणाम अविश्वसनीय आणि अनपेक्षित आहेत. आम्ही याच्याबद्दल अधिक आत्मपरीक्षण करू. आमचे कार्यकर्ते आणि नेते हैराण झाले आहेत, कोणालाच विश्वास बसत नाही आहे की, हे नेमकं काय झालं. महाराष्ट्रातील जे सहा विभाग आहेत, तिथे असे काही नेते आहेत, ज्यांचा विजय निश्चित होता, त्यांचाही पराभव झाला आहे. काही जिल्हे असे आहेत, जिथे आमची एकही जागा निवडून आली नाही”, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीच्या १०० टक्के जिंकणाऱ्या उमेदवारांचाही पराभव झाला आहे. आम्ही याचा सखोल तपास करू, आम्ही जनतेसमोर जाऊ. आमचा महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे. महाराष्ट्राची जनता हा निकाल कधीच मान्य करणार नाही”, असे ते म्हणाले.
सलग आठ वेळा निवडणूक जिंकणारे बाळासाहेब थोरात यांचाही पराभव झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही पराभव झाला. म्हणून मला या निवडणुकीवर शंका आहे. आम्ही निकालांचा अभ्यास करू आणि जनतेसमोर येऊ. हा निकाल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावनेनुसार नाही, असे ते म्हणाले.