ही भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवार गरजले

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिलाच वर्धापन दिन शरद पवार गटाने अहमदनगरमध्ये, तर अजित पवार गटाने मुंबईत साजरा केला.
शरद पवार
शरद पवार

अहमदनगर : येत्या डिसेंबरमध्ये शरद पवार हे ८५ वर्षांचे होणार आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पवार यांना आपण आपल्या पक्षाचे ८५ आमदार निवडून द्यायचे आहेत. हे लक्षात ठेवा, असे विधान 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिलाच वर्धापन दिन शरद पवार गटाने अहमदनगरमध्ये, तर अजित पवार गटाने मुंबईत साजरा केला. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी जोरदार भाषण केले. रोहित पवार म्हणाले की, दुसऱ्या राष्ट्रवादीकडे पैसा, सत्ता असला तरीही जनतेने त्यांना नाकारले आहे. पवार हे रोजगार, शेतकऱ्यांच्या मालाच्या भावावर बोलत आहेत. आता हे यश पाहून आपल्या डोक्यात हवा जाऊ देता कामा नये. येणाऱ्या निवडणुकीत पलीकडच्या अनेक लोकांना आपण विश्रांती द्यायची आहे, असा टोला त्यांनी मारला.

मोदी साहेबांचा प्रचार मी सांगण्याची गरज नाही. पंतप्रधान एका पक्षाचा नसतो, देशाचा असतो. त्यांनी सर्व जाती,धर्म, भाषा आणि प्रांताचा विचार करायचा असतो. हे त्यांनी मुद्दाम केलं. कारण विचारधारा त्याची तशीच आहे. आज या लोकांसाठी एक प्रकारचा विश्वास देण्याची कामगिरी राज्यकर्त्यांना करावी लागते. त्यांनी माझा उल्लेख ‘भटकती आत्मा’ म्हणून उल्लेख केला. एका दृष्टीने बर झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही", असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा २५ वा वर्धापनदिन अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलाय. यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार उपस्थित होते.

पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली. त्यांनी राज्य केली. मराठी माणसाचा आत्मविश्वास वाढवला. त्यांचा उल्लेख करताना नकली बापाची शिवसेना म्हणाले. हे शोभत का? त्यांना तारतम्य राहिले नाही. सत्ता जाणार हे दिसले की माणूस अस्वस्थ कसा होतो हे दिसलं. आपण नव्या विचाराने जाऊया. समाजातील सर्व घटकांसाठी आणि त्यांच्या हितासाठी काम करुयात. निवडणुका येतील, आपण निवडणुकांना सामोरे जाऊ. मनापासून सेवा करण्याचे वचन लोकांना देऊ. पंतप्रधानांनी शपथ घेतली, पण लोकांनी त्यांना सहमती दिली नव्हती. देशातील जनतेने त्यांना बहुमत दिले नाही. तेलगू देसम आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांची त्यांनी मदत घेतली, त्यामुळे त्याठिकाणी त्यांचे राज्य झालं. आजचे जे सरकार आहे, ते वेगळे सरकार आहे. निवडणुकीच्या काळामध्ये मोदी जाईल त्या ठिकाणी मोदी सरकार, मोदी गॅरंटी म्हणत होते. आज ती मोदी गॅरंटी राहिली नाही, आज ते मोदी सरकार राहिलेले नाही. आज तुम्ही लोकांनी तुम्ही मताच्या अधिकारावर तुम्ही सांगितलं की, हे मोदी सरकार नाही. तर इंडिया सरकार आहे. आपण पुढे जायचे आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यात आपल्याला सरकार आणायचे आहे, लोकांना विश्वास द्यायचा आहे, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in