हा आठवडा पावसाचा; राज्यात गारपिटीची शक्यता, अवकाळी पाऊस बरसणार, हवामान विभागाची माहिती, मुंबईमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण
पुणे : मुंबईसह राज्याच्या अनेक भागांमध्ये मंगळवारी ढगाळ वातावरण असतानाच राज्यात सर्वदूर पावसाच्या सरी बरसणार असल्याची आणि एप्रिल, मे, जूनमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील पाच-सात दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
गुढीपाडव्यापासूनच राज्याच्या काही भागांमध्ये उकाडा वाढला, तर काही भागांमध्ये दमट हवामानात आणखी भर पडली. मुंबईत सध्या अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात सातत्याने होणाऱ्या हवामान बदलासह मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रता वाढण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळे पुढील २४ तासांसह चालू आठवड्यात राज्याच्या बहुतांश भागांसह मुंबई महानगर प्रदेशात आणि उपनगरांमध्येही अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्रात हवेत चक्रीय स्थिती आहे हे त्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे वातावरणातील खालचा जो भाग आहे, तिकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे वारे असतात. वरच्या थरात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे वारे असतात. अशी परिस्थिती ढगाळ वातावरणासाठी तथा विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्यासाठी पूरक असते. अशी परिस्थिती मागच्या दोन दिवसांपासून दिसत आहे, अशी माहिती डॉ. सानप यांनी दिली.
गारपिटीची शक्यता कोठे?
मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर, जळगाव, सातारा, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची किंवा काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवार आणि बुधवारसाठी ऑरेंज अलर्ट आहे. नंतर तो यलो अलर्ट असेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त तापमान असण्याची शक्यता आहे. पुढचे पाच दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या येणारा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस आहे, असेही डॉ. सानप यांनी सांगितले.
कोकणातही हीच स्थिती...
फक्त मुंबई आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाडाच नव्हे, तर दक्षिण कोकणातही हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरीसह नजीकच्या परिसरात पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, उत्तर कोकणासह ठाणे, कल्याण भागालासुद्धा पावसाचा तडाखा बसेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानाच्या या स्थितीमुळे मुंबई शहरातील तापमानात घट झाली असली तरीही उष्मा मात्र कमी झालेला नाही. त्यामुळे अवकाळीनंतर होरपळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ऑरेंज अलर्ट
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रमध्ये अवकाळीची शक्यता आहे, तर काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे. फळबागा आणि शेतपिकांवर याचे परिणाम होणार असल्यामुळे हवामानाची ही स्थिती शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पुणे, नाशिक, नगर, जळगाव, सातारा या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना उद्या आणि परवा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात गारपीट
कराड, सांगली, सातारा पट्ट्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली. यामुळे या भागातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पाऊस व गारपिटीमुळे हवेतील उकाड्यापासून लोकांची सुटका झाली. कोकणातही वैभववाडी तालुक्यात भुईबावडा, कुसूर, ऐनारी या भागात तसेच रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला.
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस
कोकण किनारपट्टी परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा विचार केला तर या विभागातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती ४ आणि ५ तारखेला विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.