छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती येत्या १९ फेब्रुवारी राज्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या शिवजयंती उत्सवानिमित्ताने आपला ठसा उमटवून राजकीय लाभ उठवण्याची तयारी भाजपने केली आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रातील रालोआ सरकार या उत्सवात सहभागी होण्यासाठी सरसावले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवजयंती उत्सवानिमित्त आभासी पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत.
राजकीय सूत्रांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून महाराष्ट्रातील जनतेसह देशभरात त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा अनेक पिढ्यांच्या मनात कोरला गेला आहे. याचा राजकीय फायदा उचलण्याची तयारी भाजपकडून केली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा तरुणांना आकर्षित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा, त्यांच्या कार्याचा त्यांनी प्रभावीपणे वापर केला होता.
आता राजकीय गणिते बदलली असून केंद्रातील रालोआ व राज्यातील महायुती सरकारने एकत्र येत ‘शिवजयंती’ उत्सव जोरदार साजरा करण्याचे ठरवले आहे. याचाच भाग म्हणून ‘जय शिवाजी-जय भारत’ ही पदयात्रा राज्यात काढण्यात येणार आहे. त्याचा मुख्य कार्यक्रम पुण्यातील शनिवार वाडा येथे होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय युवा व क्रीडामंत्री मनसुख मांडविया हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत.
केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. त्यानुसार, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवजयंती उत्सवात स्थानिक पातळीवर सहभाग घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या सोहळ्याला खासदार व आमदारांना सहभागी होण्यास सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवजयंतीला सकाळी ७.३० वाजता आभासी पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सकाळी ८ ते १० ‘जय शिवाजी-जय भारत’ ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा किमान ६ किमीची असावी, असे केंद्राच्या पत्रात नमूद केले आहे. तसेच या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना, एनकेवायएस, शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घ्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.