"जे जे गडी विरोधात आहेत, ते सगळे भ्रष्टाचारी..."; सदाभाऊ खोत यांचे मोठे विधान

या मोठ्या गड्यांना मातीत घाला. तरच, हा महाराष्ट्र सन्मानाने उभा राहू शकतो, असे सूचक विधानही सदाभाऊ खोत यांनी या सभेत केले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

"जे जे गडी विरोधात आहेत, ते सगळे भ्रष्टाचारी आहेत", असे वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी इचलकरंजीच्या सभेत केले आहे. या मोठ्या गड्यांना मातीत घाला. तरच, हा महाराष्ट्र सन्मानाने उभा राहू शकतो, असे विधानही खोत यांनी या सभेत केले आहे. काही दिवसांपूर्वीही, 'ईडीची गती वाढवा, एकतर गडी आपल्यात आला पाहिजे. नाही तर घाबरून मेला पाहिजे', असे वक्तव्य खोत यांनी सोलापूरच्या सभेत केले होते.

नेमके काय म्हणाले?

सदाभाऊ खोत म्हणाले, "जे जे गडी विरोधात आहेत, ते सगळे भ्रष्टाचारी आहेत. एका एका गड्याला आत घालायला सुरुवात करा. सगळे गडी रांगत रांगत चालयला लागतील. पण, तुम्ही काय करताय, नुसते भीती दाखवता आणि सोडून देत आहात, असे करू नका. तुम्हाला सांगतो, जे विरोधात आहेत, ते सगळे भ्रष्टाचारी आहेत. तुम्ही यांच्या फाईली वर काढा. पण, हे गडी हुशार आहेत, चांगली कपडे आणि जॅकीट घालून तुमच्याकडे येतात आणि गोड गोड बोलू लागतात. तुम्हाला वाटते की, मोठा गडी आला. तो मोठा गडी नाही. हा मोठा-बिटा काही नाही, हे बारके गडी बरोबर ठेवा आणि या मोठ्या गड्यांना मातीत घाला. तरंच, हा महाराष्ट्र सन्मानाने उभा राहू शकतो.

सोलापूरच्या सभेत काय म्हणाले होते?

"कुणी काहीही म्हणू द्या. पण, देवेंद्र फडणवीस यांना मानतो, लोक म्हणतात काही झाले तरी, ईडी मागे लावतात. पण मी म्हणतो ईडीची गती वाढवा. गडी एकतर आपल्यात आला पाहिजे. नाही तर घाबरून मेला पाहिजे", असे वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले होते.

म्हातारा लय खडूस...

यापूर्वी सदाभाऊ खोत यांनी महायुतीचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारसभेत शरद पवार यांच्यावर ग्रामीण भाषणेत टीका केली होती. त्यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, "या वयात बापपण पोरगा कर्तबगार झाला की, प्रपंच त्यांच्या हातात देतो आणि गप्प बसतो. पण हा म्हातारा लय खडूस आहे. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतोय. अजित दादा किल्लीकडे बघून बघून म्हातारे झाले. मग अजित दादाच्या लक्षात आले की, हा म्हातारा कंबरेची किल्ली काढत नाही. म्हणून दादा आता किल्लीला लोंबकळत म्हणतोय की, किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही. कारण आता हे बास झालं, अरे आम्हालापण प्रपंच करू द्या. काय म्हातारा झाल्यावर प्रपंच करायचा का? आणि म्हणून दादासुद्धा विकासासाठी भाजपसोबत आले आहेत", असेही खोत म्हणाले होते.

logo
marathi.freepressjournal.in