पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी अज्ञात व्यक्तीने दिली आहे. अज्ञात व्यक्तीने फोन करून पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याने पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनी तातडीने रेल्वे स्थानकावर धाव घेत एक्स्प्रेस थांबवून बॉम्बचा शोध सुरू केला. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. प्रवाशांनीही जीव मुठीत धरून स्थानकातून पळ काढला. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काल रात्री अज्ञात व्यक्तीने इसमाला फोन करून पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. ही धमकी मिळताच रेल्वे पोलिसांना सतर्क करण्यात आले. पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी सुरू केली. पोलिसांनी तात्काळ प्रवाशांना बाहेर काढले. रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचे प्रवाशांना समजल्यानंतर प्रवाशांमध्येही घबराट पसरली. प्रवाशांनीही जीव मुठीत धरून धाव घेतली. त्यानंतर रेल्वे पोलिसांच्या श्वान पथकाने संपूर्ण रेल्वे प्लॅटफॉर्म, रेल्वे रुळ, फलाटावरील प्रत्येक खोली आणि एक्स्प्रेसची पाहणी केली. यावेळी पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.
याशिवाय कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, हा धमकीचा फोन कोणी केला? ते कोठून आले ही माहिती प्राप्त झालेली नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, पोलिसांनी या गजबजलेल्या रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवली असून सर्वांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच रेल्वे प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे. २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानक आणि कामशेत रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. पहाटे 2 वाजल्यापासून पुणे रेल्वे स्थानक आणि कामशेत रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी रात्रीपासूनच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तपासणी सुरू केली आहे. कॉलचा तपास सुरू आहे. पोलीस आयुक्तांनी पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.