हर्षवर्धन पाटलांनी अजितदादांविरुद्ध थोपटले दंड; इंदापुरात महायुतीत वाद पेटला: जीवाला धोका असल्याचे शिंदे, फडणवीसांना पत्र

आपल्या मित्रपक्षाचे काही पदाधिकारी मतदारसंघात सभा घेऊन माझ्याविरोधात शिवराळ भाषेत बोलत माझ्याविरोधात बेताल वक्तव्य करीत आहेत. एवढेच नव्हे, तर मला...
हर्षवर्धन पाटलांनी अजितदादांविरुद्ध थोपटले दंड; इंदापुरात महायुतीत वाद पेटला: जीवाला धोका असल्याचे शिंदे, फडणवीसांना पत्र
Published on

विशेष प्रतिनिधी/मुंबई

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच अजितदादांच्या लोकसभा निवडणूक मार्गात महायुतीतून काट्यांची पेरणी सुरू आहे. राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येने ‘पाठीत खंजीर’ खुपसल्याचा दाखला दिला, त्यानंतर पुरंदरचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आणि आता हर्षवर्धन यांनीच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र धाडले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थेट विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी करीत आहे. परंतु या मतदारसंघातील महत्त्वाचा तालुका असलेल्या इंदापुरात वेगळेच चित्र पाहायला मिळाले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपचे नेते आहेत, तर अजित पवार हे त्यांचे एकेकाळचे कट्टर विरोधक आहेत. आता यांच्यात कसे सूत जुळणार, असा प्रश्न उपस्थित होत असताना हर्षवर्धन पाटील यांनी आता अजित पवार गटाविरोधातच आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत हर्षवर्धन पाटील, अजित पवार गटातील वाद टोकाला जाण्याची चिन्हे आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात खा. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यासाठी खा. सुळे यांच्या विरोधात आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये सभांचा धडाका लावत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात चांगलीच वातावरण निर्मिती केली आहे. तसेच मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातही कार्यक्रम घेत तयारी सुरू केली आहे. मात्र, या तयारीदरम्यान इंदापुरातील भाजपचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या संगीता पाटील आणि पुत्र राजवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप करीत विधानसभेचा शब्द दिला तरच आम्ही महायुतीत प्रामाणिकपणे काम करू, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

दरम्यान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पवार कुटुंबीयांविरोधात प्रचंड राग असून, त्यातल्या त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल तर कार्यकर्त्यांत प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे महायुतीत असूनही पाटील यांचे कार्यकर्ते अजित पवार यांचे कार्य करण्याची शक्यता कमीच आहे. असे वातावरण असतानाच आता थेट माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आता आपल्याला अजित पवार गटाकडून धमकीचे फोन येत असून, आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या पुढे दोन्ही गटांतील वाद आता चांगलाच उफाळण्याची शक्यता आहे. याचा फटका अजित पवार अर्थात ते जे उमेदवार देतील, त्यांना बसू शकतो.

लेटरबॉम्बने खळबळ

आपल्या मित्रपक्षाचे काही पदाधिकारी मतदारसंघात सभा घेऊन माझ्याविरोधात शिवराळ भाषेत बोलत माझ्याविरोधात बेताल वक्तव्य करीत आहेत. एवढेच नव्हे, तर मला तालुक्यात फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे या लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालावा, असे पत्र माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. त्यांचा रोख थेट अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांच्याकडे असून, या लेटरबॉम्बमुळे महायुतीत खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रतिष्ठेच्या बारामती लोकसभा निवडणुकीत महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याने याचा फटका अजित पवार यांच्या गटाला बसू शकतो.

logo
marathi.freepressjournal.in