मुंबई : राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना अज्ञात इसमाने दूरध्वनीवरून धमकी दिल्यानंतर पोलिसांनी त्याबाबतचा तपास सुरू केला आहे, असे बुधवारी एका अधिकाऱ्याने सांगितले. खडसे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार) असून लवकरच त्यांनी स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.
खडसे यांना सोमवारी एका अज्ञात क्रमांकावरून दूरध्वनी आला आणि गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क साधला. दूरध्वनी करणाऱ्या इसमाने खडसे यांना धमकी देताना कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम आणि छोटा शकील यांची नावे घेतली. धमकी देणाऱ्या इसमाचा अद्याप शोध लागलेला नाही. खडसे यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खडसे यांना यापूर्वीही धमकीचे दूरध्वनी आले होते.