हरियाणातील चार दहशतवाद्यांकडुन साडे तीन किलो आरडीएक्स जप्त

हरियाणातील चार दहशतवाद्यांकडुन साडे तीन किलो आरडीएक्स जप्त

पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील तरनतारन जिल्ह्यात रविवारी पंजाब पोलिसांनी साडे तीन किलो आरडीएक्स जप्त केले आहे. हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार दहशतवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आरडीएक्स जप्त करण्यात आले असून याचा वापर पंजाबबरोबरच मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी करण्याचा कट होता, अशी माहिती पोलीसांच्या हाती लागल्याचे सुत्रांनी सांगितले.

तरनतारनचे जिल्हा पोलीस प्रमुख रणजीतसिंह यांनी सांगितले की, ‘‘हरियाणा पोलिसांनी नुकतेच चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी तरनतारन येथील एका जुन्या पडक्या इमारतीत साडे तीन किलो आरडीएक्स ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आमच्या पथकाने छापा टाकला असता आरडीएसचा हा साठा हाती लागला आहे.’’

पंजाबमध्ये आपचे सरकार सत्तेवर आल्यापासून सतत काही ना काही घडामोडी घडत आहेत. पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी मोठे बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. तरनतारन येथे सापडलेले आरडीएस याच कटाचा भाग असावा, असेही बोलले जात आहे. पाकिस्तान तरनतारनमधून भारतात दहशतवादी घुसवण्याबरोबरच शस्त्रास्त्रे, स्फोटके भारतात पाठवत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआय तरनतारनमधील तरुणांना दहशतवादी कायवायांचे प्रशिक्षण देत असल्याचेही समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी मोठ्या संख्येने दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे.

पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून हे आरडीएक्स भारतात पाठवले होते, अशी माहिती चौकशीत पोलिसांना मिळाली आहे. या साऱ्या प्रकरणाची चौकशी पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा करत आहेत. देशात आणखी कुठे बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in