विशेष प्रतिनिधी / मुंबई
नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर केली असून, गडकरी आता प्रचाराला लागले आहेत. त्यांनी आपल्या कामातून राष्ट्रीय पातळीवर एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोण लढत देणार, असा प्रश्न होत होता. काँग्रेसनेही तशी चाचपणी सुरू केली होती. मात्र, चर्चेतला चेहरा काही अद्याप समोर आलेला नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे तीन बडे नेते एकत्रित आले आहेत. त्यासाठी त्यांनी गडकरीविरोधात सक्षम उमेदवार देण्याची तयारी सुरू केल्याचे समजते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार आहेत. यासोबतच जिल्ह्यातील आणखी एक नेते सतीश चतुर्वेदी माजी मंत्री आहेत आणि नितीन राऊतही माजी मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यात सख्य नसल्याने नागपूरमध्ये भाजपचे प्रस्थ वाढत गेले. आता एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरीकडे नितीन गडकरी यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून काँग्रेसचे बळ कमी करण्याचा प्रयत्न केला.
आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा जुनेजाणते नेते कामाला लागले आहेत. नागपुरात विलास मुत्तेमवार सक्रिय आहेत. प्रत्येक मुद्यावर रोखठोक मत मांडणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. याशिवाय सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत यांची जिल्ह्यात वेगळी ओळख आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आता हे तिन्ही नेते कामाला लागले आहेत. जिल्ह्यातील या तिन्ही नेत्यांचे प्रस्थ मोठे असताना यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेने राहिल्यामुळे नागपुरात काँग्रेसला म्हणावे तसे यश मिळविता आले नाही. तथापि, आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे तिन्ही नेते एकत्रित आले असून, कॉँग्रेसचा उमेदवार म्हणून कोणाला मैदानात उतरवतात, हे पाहावे लागेल. परंतु त्यादृष्टीने आता हे नेते तयारीला लागले असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही नेते मागच्या अनेक वर्षांपासून एकत्रित आलेले नव्हते. परंतु आज या तिन्ही नेत्यांनी एकत्रित प्रवास केला. याचा अर्थ पक्षीय पातळीवर उमेदवार निवडीच्या हालचाली सुरू झाल्या असून, या माध्यमातून एक तगडा उमेदवार मैदानात उतरवून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. खुद्द मुत्तेमवार यांनी तसे स्पष्ट संकेत दिले.
तगडी फाइट होणार?
नागपूरमधून भाजपने पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच उमेदवारी मिळाल्याने त्यांच्यासमोर काँग्रेस कोणाला मैदानात उतरविणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यातच बऱ्याच काँग्रेस नेत्यांनी गडकरींविरोधात लढण्यास असमर्थता दर्शविल्याचे बोलले जात होते. परंतु नागपूरमधील काँग्रेसचे जुनेजाणते, लोकप्रिय असलेले नेते कामाला लागल्याने गडकरींविरोधात तगडा उमेदवार उतरविला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसचे सर्व नेते एकत्रित येऊन एकजुटीने कामाला लागल्यास गडकरी यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहू शकते, असे बोलले जात आहे.