
परभणीत मॉब लिंचिंगमुळे एकाचा जीव गेला आहे. तर दोन जण गंभीर जखमी असल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकादा राज्यभर खळबळ उडाली आहे. शेळ्या चोरल्याच्या संशयावरुन तीन मुलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. परभणीतील उखलद गावात शेळ्या चोर आहेत, या संशयावरुन जमाव तीन मुलांवर तुटून पडला. या घटनेत या मुलांना संतप्त जमावाकडून बेदम मारहाण झाली. या तीन मुलांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर इतर दोन जण गंभीर झाले आहेत.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाच्या तावडीतून तिघांची सुटका केली. तिन्ही मुलांना उचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी एका अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
राज्यात या अगोदर देखील मॉब लिचींगच्या घटना घडल्या आहेत. ज्यांचे परिणाम राज्यसह देशात पाहायला मिळाले आहेत. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा येथे याच प्रकारे लहान मुलं पळवणारी टोळी समजून चार साधूंवर जमावाने हल्ला केला होता. हे चारही साधू उत्तर प्रदेशातील रहिवासी होते. ते कर्नाटकातील विजापूरहून पंढपूरला जात होते. यावेळी त्यांनी स्थानिकांना रस्ता विचारल्याने त्यांच्यावर जमावाने हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
तसेच एप्रिल 2020 मध्ये देखील पालघर जिल्ह्यात मॉब लिंचिंगची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. या घटनेत दोन साधुंसह तीन जणांना लहान मुलं पळवणारी टोळी समजून जमावाने बेदम मारहाण केली होती. यात तिघांचा मृत्यू झाला होता. पालघरच्या गडचिंचळे गावात ही घटना घडली होती. याप्रकरणी 250 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. हे साधू मुंबईहून सुरतला कारने जात होते. या घटनेची राज्य सरकारकडून सीबीआय चौकशी करण्यात येणार आहे. राज्यातील या दोन मॉब लिचिंगच्या घटना गाजल्या असताना आता, परभणीत देखील त्याच प्रकरातील घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.