तलावात बुडून आईसह तीन मुलींचा मृत्यू

या चौघी रविवारपासून बेपत्ता होत्या. त्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
तलावात बुडून आईसह तीन मुलींचा मृत्यू

जिल्ह्यातील जत तालुक्यातील बिळूर येथून बेपत्ता असलेल्या महिलेसह तिच्या तीन मुलींचे तलावात मृतदेह आढळून आले. सुनिता तुकाराम माळी (वय २७), अमृता तुकाराम माळी (वय १३), अंकिता तुकाराम माळी (वय १०), ऐश्वर्या तुकाराम माळी (वय ७) असे मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. या चौघी रविवारपासून बेपत्ता होत्या. त्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

बिळूर गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर सुतार फाट्याजवळ तुकाराम चंद्रकांत माळी यांचे घर आहे. घराजवळच त्यांची शेती असून, लगतच लिंगनूर तलाव आहे. रविवारी सकाळपासून त्यांची पत्नी सुनीतासह अमृता, अंकिता व ऐश्वर्या या तीन मुली बेपत्ता होत्या.दिवसभर शोधाशोध करूनही चौघी सापडल्या नाहीत. तुकाराम माळी यांनी सासरवाडी कोहळी (ता. अथणी) येथेही चौकशी केली; पण त्या तेथे गेल्या नसल्याचे समजले. चौघींचाही शोध न लागल्याने अखेर तुकाराम माळी यांनी चौघी बेपत्ता झाल्याची फिर्याद जत पोलीस ठाण्यात दिली.

एकाच वेळी आई व तिन्ही मुली बेपत्ता झाल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास माळी यांच्या घराजवळ असलेल्या लिंगनूर तलावात चौघींचेही मृतदेह तरंगताना दिसले. ग्रामस्थांनी पोलिसांना पाचारण करून मृतदेह तलावातून बाहेर काढले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तुकाराम माळी यांना दारूचे व्यसन आहे. त्यातूनच तुकाराम व पत्नी सुनीता यांच्यात सतत खटके उडत होते. कौटुंबिक वादाला कंटाळून सुनीता यांनी हे टोकाचे पाऊल उचलत आपल्या तिन्ही मुलींसह आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. याला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. जतचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी घातपाताची शक्यता नसून ही दुर्घटना असल्याचा अंदाज व्यक्त केला. नेमकी घटना कशामुळे घडली, याचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in