नगरमध्ये नवे तीन उड्डाणपूल होणार, वाहतूककोंडीची समस्या दूर होणार; १२५ कोटींचा निधी मंजूर

या तीन नव्या उड्डाणपुलामुळे मनमाड रोड व छत्रपती संभाजी नगर रोडवरील वाहतूककोंडीची समस्या दूर होणार आहे.
नगरमध्ये नवे तीन उड्डाणपूल होणार, वाहतूककोंडीची समस्या दूर होणार; १२५ कोटींचा निधी मंजूर
Published on

अहमदनगर : नगर-पुणे महामार्गावरील स्टेशन रोडवर सुमारे तीन किलोमीटरचा भव्य उड्डाणपूल उभारणी यशस्वी केल्यानंतर आता नगर दक्षिण मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या पाठपुराव्याने नगर शहरात आणखी ३ उड्डाणपूल मंजूर झाले आहेत.

नगर-छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील पोलीस अधीक्षक कार्यालय चौक तसेच नगर-मनमाड महामार्गावरील नागापूर येथील सन फार्मा चौक व याच रस्त्यावरील सह्याद्री चौक अशा तीन नव्या उड्डाणपुलांसाठी १२५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या तीन नव्या उड्डाणपुलामुळे मनमाड रोड व छत्रपती संभाजी नगर रोडवरील वाहतूककोंडीची समस्या दूर होणार आहे. अहमदनगर-मनमाड रस्ता प्र. रा. मा. ०८ वरील डी. एस. पी. चौक अहमदनगर येथे उड्डाणपुलाच्या बांधकामास ७१ कोटी रुपयांच्या निधी तसेच या रस्त्यावरील सह्याद्री चौक आणि सनफार्मा चौक येथे देखील दुपदरी उड्डाणपुलाच्या बांधकामास ५२ कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या निधीमध्ये नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम, सेवा रस्ता व पोहोचमार्गाचे बांधकाम तसेच संकीर्णबाबी आदी गोष्टींचा समावेश असेल. दरम्यान अहमदनगर वासियांसाठी ही महत्वाची बातमी असून वाहतुकीच्या कोंडीमुळे येथे मोठा अडथळा निर्माण होत होता आणि नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. आता तो त्रास दूर होणार आहे असे मत मांडून खासदार विखेंनी सदरील निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in