विशेष प्रतिनिधी/मुंबई
पुणे लोकसभा मतदारसंघावर सर्वांचीच नजर आहे. या मतदारसंघात भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता असली तरी काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळावी, यासाठी मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गाठीभेटी घेतल्या. परंतु तरीही त्यांच्या नावाचा विचार होताना दिसत नाही. या जागेवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. अशा स्थितीत वसंत मोरे यांनीही मैदानात उतरण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पुण्यात यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
वसंत मोरे यांची पुण्यात एक वेगळी प्रतिमा आहे. एक डॅशिंग नेता म्हणून मनसेत त्यांची ओळख होती. मात्र, अंतर्गत मतभेदामुळे त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. त्यामुळे ते कोणता मार्ग स्वीकारतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच त्यांनी आधीच पुण्यात लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार पक्का केला होता. त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडीतून जर उमेदवारी दिली गेली, तर काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यासोबतच पुण्यातील काँग्रेस नेत्यांसोबतही चर्चा केली आणि उमेदवारीबाबत चाचपणी केली. परंतु काँग्रेसने अद्याप ग्रीन सिग्नल दिलेला नाही. त्यातच काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांनाच मैदानात उतरविण्याचा विचार केला आहे. जवळपास धंगेकर यांचेच नाव निश्चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता वसंत मोरे यांनीही स्वाभिमानाची लढाई लढण्यास सज्ज असल्याचे म्हटले आहे. ‘काहीही झाले तरी आपण पुण्यात मैदानात उतरणारच,’ असा निर्धार बोलून दाखविला आहे.
पुण्यात निवडणूक एकतर्फी होईल, असे बोलले जात आहे. परंतु मी ही निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही, असे सांगताना लोकसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याचे संकेत त्यांनी दिले. भाजपने मागच्या पाच वर्षांत शहराचे फार मोठे नुकसान करून ठेवले आहे. संपूर्ण शहराचा खेळखंडोबा झालेला आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपच्या कृतीला उघडे पाडू आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असेही वसंत मोरे म्हणाले. अजूनही माझा विचार होईल, असे वाटते. त्यातून जर वेळ आली तर आपण अपक्ष उमेदवार म्हणून लढू, असेही वसंत मोरे म्हणाले. यात माझे मित्र आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळत असेल, तर त्यांच्यासाठी ही चांगली संधी असेल, परंतु आता माझी माघार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुण्यात आता भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि अपक्ष म्हणून वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत होऊ शकतो, याचा नेमका कोणाला फायदा आणि तोटा होणार, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.