सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना यंदा मुहूर्त ; कोरोनात रखडलेल्या २० टक्के बदल्या होणार

राज्यात सत्ता बदल झाला असल्याने विनंती बदल्यांचे प्रमाण यंदा मोठे आहे. विनंती बदल्या या १०० टक्के व्हाव्यात
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना यंदा मुहूर्त ; कोरोनात रखडलेल्या २० टक्के बदल्या होणार

कोरोना संसर्गामुळे गेले तीन वर्षे रखडलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना यंदा मुहूर्त मिळणार आहे. यंदा मात्र विक्रमी २० टक्के बदल्या होणार आहेत. सरकारचा केवळ वर्षभराचा कालवधी राहिल्याने मंत्री कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेले कर्मचारीसुद्धा सुरक्षित जागी बदली करुन घेण्यासाठी सध्या प्रयत्नरत आहेत.

महाविकास आघाडी सरकार २०१९ मध्ये राज्यात सत्तेत आले. त्यानंतर २०२० आणि २०२१ या वर्षात राज्यात कोरोना संसर्गामुळे बदल्या न करण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण होते. सामान्य प्रशासनाकडून तसे आदेश देण्यात आले होते. मागच्या वर्षी बदल्यावरची स्थगिती उठवली, पण, बदल्याचे प्रमाण अत्यल्प राहिले.

महाराष्ट्र शासन बदली अधिनियम २००५ नुसार ३ वर्षे सेवा पूर्ण केलेला कर्मचारी बदलीस पात्र ठरतो. एप्रिल ते मे महिन्यात या बदल्या होतात. यंदा मोठ्या संख्येने बदल्या होत असून मंत्रालय स्तरावर बदल्याची मोठी धावपळ चालु आहे.

संबधीत विभागाच्या खातेप्रमुखाला बदल्याचे अधिकार आहेत. तरी मंत्री कार्यालयापर्यंत बदल्यांसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या होत असलेल्या बदल्या अ, ब आणि क वर्गातल्या आहेत. यंदा २० टक्क्यांपर्यंत बदल्या होतील, असा दावा कर्मचारी संघटनांचा आहे.

राज्यात सत्ता बदल झाला असल्याने विनंती बदल्यांचे प्रमाण यंदा मोठे आहे. विनंती बदल्या या १०० टक्के व्हाव्यात. अशी कर्मचारी संघटनांची अनेक वर्षापासुनची मागणी आहे. ती यंदा प्रत्यक्षात उतरताना दिसते आहे. महसुल विभागात बदलीसाठी चकरा मारणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in