विशेष मुलांच्या विकासाला प्रोत्साहन देणार :प्रारंभिक उपचार व पुनर्वसन केंद्रात मिळणार सुविधा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण

मुलांची सर्वांगीण काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी, सर्व प्रकारच्या वैद्यकीय शाखांची एकत्रित अशी सुविधा या केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणार आहे
विशेष मुलांच्या विकासाला प्रोत्साहन देणार
:प्रारंभिक उपचार व पुनर्वसन केंद्रात मिळणार सुविधा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण
PM
Published on

मुंबई : विशेष मुलांसाठी नायर रुग्णालयाअंतर्गत नागपाडा येथील ओझोन बिझ  सेंटर, बी व सी विंग, बेलासिस मार्ग येथील प्रारंभिक उपचार व पुनर्वसन केंद्रात सुविधा मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवार २४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता प्रारंभिक उपचार व पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

मुलांची सर्वांगीण काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी, सर्व प्रकारच्या वैद्यकीय शाखांची एकत्रित अशी सुविधा या केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांना अत्याधुनिक, सहज उपलब्ध, परवडणारी आणि एकात्मिक पुनर्वसन सेवा एका छताखाली देण्याचे ध्येय या केंद्राच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे. ह्या मुलांच्या वैयक्तिक गरजांमधील  फरक  आणि त्यांच्या  शिकण्याच्या शैलीनुसार बनवलेल्या बहुविद्याशाखीय सेवा प्रदान करण्यासाठी पालिका प्रशासन वचनबद्ध आहे, असे पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी नमूद केले.

प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र (ई. आय. आर. सी. सी.) ओझोन बिझ  सेंटर, बी व सी विंग, बेलासिस मार्ग, नागपाडा, मुंबई सेंट्रल येथे स्थित असून सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत तर शनिवार सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हे केंद्र नियमितपणे सुरू राहणार आहे.

हे केंद्र कार्यान्वयित करण्यासाठी पालिकेकडून वेगाने कामकाज करण्यात आले. हे केंद्र कार्यान्वयित झाल्यानंतर विशेष गरजा असलेल्या मुलांमध्ये कार्यक्षमतेची सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना सक्षम बनवू, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केला.

डॉ. सुरभी राठी यांनी नमूद केले की, या केंद्राच्या माध्यमातून महानगरपालिकेने शास्त्रसिद्ध उपचार आणि प्रशिक्षण देणारे चिकित्सालयीन उत्कृष्टतेचे केंद्र स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांच्या कुटुंबांना लवकर आणि वेळेवर आधार देऊन त्यांच्यासाठी आशेचा किरण बनण्याचा आमचा प्रयत्न असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in