मुंबई : सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त झाले असून, बुधवारी ‘मालवण बंद’ची हाक देण्यात आली आहे. शिवसेनेसह ‘मविआ’चे नेते या बंदमध्ये सहभागी होणार असून राज्यभर आंदोलन व निदर्शने करून राज्य व केंद्र सरकारचा निषेध करणार आहेत.
पुतळा बसवताना कोणताही अभ्यास नाही, फक्त मित्र कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी घाईघाईने काम करण्यात आल्याचा आरोप करीत ‘मविआ’ने महायुतीच्या या भ्रष्ट कारभाराविरोधात आंदोलनांची हाक दिली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिक बुधवारी सकाळी ११ वाजता मालवण भराड नाका येथे ‘मालवण बंद’मध्ये सहभागी होत आंदोलन करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, भास्कर जाधव व वैभव नाईकही उपस्थित राहणार आहेत.
महायुती सरकारला घेरण्यासाठी शिवसैनिक तसेच मविआचे नेते उद्या बुधवारी मालवण येथील राजकोट किल्ल्याजवळ दाखल होणार असून भ्रष्ट महायुती विरोधात आंदोलन करत संबंधितांवर कारवाईची मागणी लावून धरणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही बुधवारी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्याजवळ जाऊन आंदोलनात सहभागी होणार आहेत.
विरोधकांची निदर्शने, सरकारवर टीकेचा मारा
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी मंगळवारी राज्यभर निदर्शने व आंदोलन करीत राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. याप्रकरणी मंगळवारी कॉंग्रेसने ठिकठिकाणी आंदोलन करून सरकारचा निषेध केला. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीने सरकारच्या निषेधार्थ उग्र निदर्शने केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याप्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ‘पुतळा कोसळल्याप्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही, तर राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत’, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली असून, महाराजांचा अपमान करणे ही भाजपची मानसिकता असल्याची टीका केली आहे. ‘पुतळा कोसळल्यानंतर नौदल आणि राज्य सरकारने एकमेकांकडे बोट दाखवू नये, महाराष्ट्राच्या जनतेला कळले पाहिजे की हे कंत्राट ठाण्यातील कंत्राटदाराला का दिले? कंत्राट देण्यासाठी काय प्रक्रिया राबवली?, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’वर उपस्थित केला आहे.
शिवरायांचा पुतळा कोसळला ही क्लेशदायी घटना - फडणवीस
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही क्लेशदायी घटना आहे. यावर कोणीही राजकारण करू नये. पुतळा उभारताना राजकोट किल्ल्यावरील वाऱ्यांचे आकलन शिल्पकाराला करता आले नसावे. आता आम्ही नौदलाच्या मदतीने त्याच ठिकाणी नवा पुतळा उभारू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले. ते पुढे म्हणाले की, दुर्घटनेनंतर पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही. अफझलखानासारख्या अशा कितीही प्रवृत्ती चालून आल्या तरी आम्ही लोकशाही पद्धतीने त्यांचा कोथळा बाहेर काढू. जे श्रीकृष्णाला मानतात तेच २०२४ च्या विधानसभेची हंडी फोडणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राजकोट किल्ल्यावर प्रशासनाकडून पंचनामा
राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मंगळवारी सकाळी पंचनामा करण्यात आला. पोलिस यंत्रणा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या माध्यमातून हा पंचनामा करण्यात आला. यावेळी नौदलाचे दोन अधिकारीही याठिकाणी पाहणीसाठी आले होते. त्यानंतरही सिंधुदुर्गातील फॉरेन्सिक विभागातील तज्ज्ञांकडून पंचनामा सुरू होता. यावेळी स्मारकाच्या ठिकाणचे मोजमाप आणि इतर बाबींची नोंद घेतली गेली.
नौदलाकडून खंत
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला याबाबत आम्हाला खंत वाटते. या पुतळ्याची जी काही हानी झाली आहे, त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटत असून, या दुर्दैवी अपघाताच्या कारणांचा त्वरित तपास करण्यात येईल, तसेच लवकरात लवकर या पुतळ्याची दुरुस्ती करण्यासाठी आणि पुन्हा एकदा त्याच ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी योग्य पावले उचलली जातील. त्यासाठी राज्य सरकार व संबंधित विभागातील तज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी नौदलाने एक टीम तयार केली आहे, असे नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
फॉरेन्सिक अहवाल केव्हा मिळणार हे गुलदस्त्यात
घटनास्थळावरून पुतळ्याचे अवशेष आम्ही जमा केले आहेत. ते आता पुढे पाठवले जातील आणि त्यानंतर त्याबाबतचा अहवाल येईल. हा अहवाल येण्यास किती दिवस लागतील? हे मात्र आम्ही सांगू शकत नाही, असे फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सांगितले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे अडचणीत?
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीचे कंत्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मित्र जयदीप आपटे यांना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अवघ्या ८ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने आपटे यांच्यासह डॉ. श्रीकांत शिंदे हेही अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. जयदीप आपटे अवघे २५ वर्षांचे असून त्यांना मूर्ती बनवण्यातील अनुभव अत्यंत तोकडा आहे. राज्यात अनेक अनुभवी मूर्तीकार असताना अननुभवी आपटे यांना हे काम दिल्याने त्यावेळी अनेकांनी शंका उपस्थित केल्या होत्या, तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता या पुतळ्याची जबाबदारी नौदलाकडे होती, असे राज्य सरकार सांगून अंग झटकण्याचा प्रयत्न करत असल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. उबाठाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी श्रीकांत शिंदे आणि जयदीप आपटे यांच्या मैत्रीचा उल्लेख करून सरकारवर टीकास्त्र डागले आहे.