राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष! मनसेचा आज गुढीपाडवा महामेळावा

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील रणधुमाळी सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोटात सामसूम आहे. २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन लोकसभा निवडणूक न लढणाऱ्या मनसेने २०२४ च्या निवडणुकीतील भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.
राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष! मनसेचा 
आज गुढीपाडवा महामेळावा

प्रतिनिधी/मुंबई

राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. मात्र मनसेच्या गोटात अद्याप तरी शांतता आहे. काही दिवसांपूर्वीच मनसे महायुतीत जाणार, अशा चर्चांना जोर आला होता. राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची थेट दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. दक्षिण मुंबईसह तीन जागा मनसेला देण्यात येणार, अशा चर्चा होत्या. त्यामुळे महायुतीत मनसेचे इंजिन जोडले जाणार, हे निश्चित होते. मात्र त्या चर्चांना अचानक ब्रेक लागला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर पार पडणार आहे. राज ठाकरे या मेळाव्यात मनसेची भूमिका जाहीर करतील. राज्याच्या राजकारणात मनसे फॅक्टर कोणाच्या बाजूने झुकणार, हे मंगळवारच्या मेळाव्यातून स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पक्षातर्फे या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत असून जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात येणार आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील रणधुमाळी सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोटात सामसूम आहे. २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन लोकसभा निवडणूक न लढणाऱ्या मनसेने २०२४ च्या निवडणुकीतील भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मध्यंतरी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरही मनसेची राजकीय भूमिका गुलदस्त्यात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचा पाडवा मेळावा मंगळवारी मुंबईत होत आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. मात्र निवडणुकीवर प्रभाव टाकून राज्यातील राजकीय गणिते बदलण्याची क्षमता असणाऱ्या राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. आपण गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सर्व प्रश्नांना उत्तर देऊ, असे राज ठाकरे यांनी ‘एक्स’ समाज माध्यमांवरून स्पष्ट केले होते.

अमित शहा यांच्या भेटीनंतर तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या वाढत्या जवळकीमुळे राज ठाकरे महायुतीसोबत जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीसोबत गेल्यास राज ठाकरे यांच्या पक्षाला दक्षिण मुंबई लोकसभेची जागा अथवा केंद्रीय मंत्री पियूष गोयल लोकसभेवर निवडून गेल्यास, रिक्त होणारी राज्यसभेची जागा मनसेला दिली जाणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीत मनसेला काही जागा सोडल्या जाणार असल्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळात या शक्यतांची चर्चा असताना राज ठाकरे मात्र शांत आहेत. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे आपले मौन सोडतील आणि भूमिका स्पष्ट करतील. त्यामुळे आजचा मेळावा मनसे कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा आहे.

आता वेळ आलीय

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर समाज माध्यमांवर सध्या गाजत आहे. यामध्ये राज ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडीओ आहे. त्यामध्ये राज ठाकरे म्हणतात, “गेल्या काही आठवड्यांपासून आपल्या पक्षाबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. याकडे मी शांतपणे पाहत आहे. तुम्हालाही अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडले असेल. मात्र, या सगळ्यावर बोलण्याची वेळ आलीय. नक्की काय घडतेय, घडवले जातेय, हे सांगण्याची वेळ आली आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर या, आपल्याशी मला बोलायचे आहे.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in