आज राजकारण म्हणजे सत्ताकारण झाले आहे,नितीन गडकरी यांनी व्यक्त केली खंत

मला खूप वेळा राजकारण कधी सोडतोय, असे वाटते, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत
आज राजकारण म्हणजे सत्ताकारण झाले आहे,नितीन गडकरी यांनी व्यक्त केली खंत
Published on

केंद्रीय मंत्री आणि भाजपनेते नितीन गडकरी यांनी आपण राजकारण कधी सोडतोय, असं वाटू लागल्याचे म्हटले आहे. नितीन गडकरी यांनी आज राजकारण म्हणजे १०० टक्के सत्ताकारण झाले आहे, अशी खंतही व्यक्त केली आहे. नितीन गडकरींच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. नागपुरातील ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, “राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे, राष्ट्रकारण आहे, विकासकारण आहे की, सत्ताकारण, हे समजून घेतले पाहिजे. महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झाले, त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते; पण आता १०० टक्के सत्ताकारण झाले आहे. मला खूप वेळा राजकारण कधी सोडतोय, असे वाटते, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत,” अशी भावनाही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. “माणसाच्या मोठेपणाचा, कर्तृत्वाचा आणि गुणवत्तेचा त्याच्या निवडून येण्याच्या गुणवत्तेशी काही संबंध नाही. जो निवडून येतो, तोच सिकंदर अशी आपल्या समाजात भावना आहे. निवडून येणाऱ्या लोकांबद्दल मला फार काही बोलायचे नाही. वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येत असतात. राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते असे म्हटले जाते,” असेही गडकरी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in